लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर- येथील आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार बोरसे (मूळ लातूर) यांचा उपसंचालकपदाचा पदभार मंगळवारी तडकाफडकी काढून घेण्यात आला. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्याच आठवड्यात दिले होते. त्याची दखल घेऊन ही कारवाई झाली. कोल्हापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्याकडे या पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव वि. पु. घोडके यांनी हा आदेश काढला आहे.
बोरसे यांच्याकडे मूळ जबाबदारी सहायक संचालक (कुष्ठरोग) लातूर या पदाची होती. त्यांच्याकडे ११ डिसेंबर २०१९ ला कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येत होते. या चार जिल्ह्यातील अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी हे त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. बदल्यांमध्ये हेतूपूर्वक अडवणूक, तसेच ते कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्र्यांपर्यंत झाल्या होत्या. ‘लोकमत’ने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल वृत्त प्रसिद्ध केल्यावर त्याची दखल घेऊन त्यांच्याकडील आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार काढून घ्यावा व त्यांची बदली अन्यत्र करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती.
------------
खुश ना..!
आरोग्य उपसंचालक डॉ. बोरसे याचा पदभार काढून घेतल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील त्याच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण होते. दुपारनंतर कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना खुश ना..! असे विचारत होते.
---------