कोल्हापूर : ‘एफसीआय’कडून रंगहीन, दुर्गंधीयुक्त निकृष्ट गहू तसेच निकृष्ट तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रासाठी झाला आहे. हा गहू आणि तूरडाळ दुकानांमधून विक्री झाल्यास ग्राहकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा थांबवावा व चांगल्या प्रतीचे धान्य द्यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.संघटनेचे सचिव चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. ‘एफसीआय’कडून निकृष्ट दर्जाची तूरडाळ व निकृष्ट, रंगहीन, दुर्गंधीयुक्त गहू महाराष्ट्रासाठी प्राप्त झाला आहे. त्याचा पुरवठा करू नये, अन्यथा ग्राहकांच्या रोषणाला दुकानदारांना सामोरे जावे लागेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावर निकृष्ट गहू किंवा तूरडाळीचा पुरवठा केला जाणार नाही, असे आश्वासन मंत्री दानवे-पाटील यांनी दिले.शिष्टमंडळात राज्य दक्षता समितीचे सदस्य राजेश अंबुस्कर, शरद कालेवर, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रासाठी निकृष्ट गहू, तूरडाळीचा पुरवठा करू नये, या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांना नवी दिल्ली येथे सादर करण्यात आले. यावेळी चंद्रकांत यादव, राजेश अंबुस्कर, शरद कालेवर उपस्थित होते.