क धी चिरमुरे-फुटाणे, कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यानंतर कधी शेंगा-गूळ, तर कधी पिठलं-भात खाऊन, तर कधी अर्धपोटीच प्रचारात तळमळीने दंग होत असत. नेता व कार्यकर्ता यांच्यातील नातेच मुळात निष्ठेचे, प्रामाणिक आणि विश्वासार्ह होते. नेत्याच्या विजयातील मैलाचा दगड होण्याच्या इराद्याने प्रचंड ईर्ष्येने प्रत्येकजण आपापल्या नेत्याच्या प्रचारात सहभागी होत.दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचे आम्ही साक्षीदार आहोत. १९६० पासून त्यांच्या सोबत ऐन तारुण्यातील युवक अत्यंत निष्ठेने आणि निरपेक्ष भावनेने एका होतकरू कार्यकर्त्याला राजकारणातील हिंदकेसरी करण्यासाठी हिरीरिने सहभागी झाले होते.भाडोत्री सायकल घेऊन, सायकललीला झेंडे लावून प्रचार केला. या सायकलीचे तासी चार आणे भाडेही कार्यकर्ते पदरमोड करून देत असत. बानगेतून सोनगेत जाण्यासाठी नावेतून पलीकडे जावे लागे, तर कागल किंवा मुरगूड येथील प्रचारसभेला बैलगाडीतून जात असत. तसेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चुना भिजवून घरांच्या भिंती रंगवायच्या आणि निळ भिजवून एका कोपऱ्यात आपल्या नेत्याचे नाव लिहून ठेवायचे, तर निवडणूक जाहीर होताच या आरक्षित जागेवर चिन्ह व नाव टाकायचे. रात्री उशिरापर्यंत सभा चालायच्या. आपल्या नेत्याच्या सभेसाठी रात्री दोन वाजेपर्यंत वाट पाहत बसलेले कार्यकर्ते आठवतात.तब्बल ५० वर्षे आम्ही स्व. मंडलिक यांच्यासोबत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्यरत राहिलो. आजही ठामपणे सांगू इच्छितो की, राजकारणातून दहा रुपयाचाही लाभ घेतलेला नाही.मात्र, स्व. मंडलिक हे राजकारणाचा लाभ समाजहितासाठी करणार असा आम्हा सर्वांचा आत्मविश्वास होता. म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या विजयासाठी जंग-जंग पछाडत होतो.आजच्या तरुणांनीही यातून बोध घ्यायला हवा. केवळ ढाब्यावर जेवण, सभेसाठी आलिशान गाड्या दिल्यानंतर विरून जाऊ नये. तसेच, तकलादू आमिषाला बळी न पडता शाश्वत विकासाचा विचार करावा. आपले आजचे मत आणि नेतृत्वाची निवड ही भावी पिढीला सुजलाम् सुफलाम् करणारी ठरावी इतकीच अपेक्षा.तानाजी पाटील, बंदुके, बानगे, ता. कागल
नेत्याच्या विजयातील मैलाचा दगड होण्याचीच अभिलाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:24 AM