कोल्हापूर : फुटबॉल सामन्यानंतर तोडफोड करणारी प्रवृत्ती ही कोल्हापूरची असूच शकत नाही. मूठभर हुल्लडबाजांमुळे लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेला फुटबॉल खेळ जर कोणी बदनाम करून कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा अप्प्रवृत्तींना आणि हुल्लडबाजांना बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती ठेचून काढेल, असे पत्रक समितीच्यावतीने संस्थापक किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.रविवारी घडलेली घटना अत्यंत दुदैवी असून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सदैव झटणारे शाहू छत्रपती, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांच्या वाहनांची नुकसान करणारी प्रवृत्ती हे कोल्हापूरच्या कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे. अशा दंगलखोर व हुल्लडबाजांवर कारवाई झालीच पाहिजे.
‘केएसए’चे पदाधिकारी आणि प्रामाणिक फुटबॉल खेळाडू, फुटबॉल रसिक, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र असून पोलीस प्रशासनाला न जुमानणाऱ्या प्रवृत्तीचा कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.कोल्हापूरचे मैदाने ही खेळांअभावी ओस पडू लागली आहेत. प्रामाणिकपणे फुटबॉल खेळ टिकविणाऱ्या फुटबॉल चाहत्यांसाठी फुटबॉल बंदी करू नये, अशी विनंती समितीने केली आहे. मैदानाच्या दुरावस्थेमुळे शिवाजी स्टेडियमवरील क्रिकेट बंद पडले आहे. मैदान दुरावस्थेबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला आहे.
फुटबॉल खेळ बंद करणे यापेक्षा अप्प्रवृत्तींना सर्वांनी मिळून रोखणे हीच सध्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून मूठभर हुल्लडबाज आणि चिथावणीखोर प्रवृत्तीला कोल्हापुरी हिसका दाखविण्याची वेळ आली, यासाठी सर्व पोलीस प्रशासन आणि ‘केएसए’ला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.