कोल्हापूर : पहिल्या लग्नाची माहिती लपवून मुलीस प्रेमसंबंधात अडकवून तिच्याशी विवाह करून तिला व तिच्या आईला विविध कामाच्या निमित्ताने सुमारे २९ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालून भामट्याने पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी गूळ व्यावसायिक, संशयित आरोपी विश्वनाथ शहाजी घाटगे (वय ३०, रा. वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्यावर रविवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्याने आपण साताऱ्यातील वजनदार लोकप्रतिनिधींचा भाचा असल्याचे सांगून हे कृत्य केल्याचे मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वनाथ घाटगे याची पीडित मुलीशी ऑनलाईनने ओळख झाली. त्याने आपण साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचा भाचा असल्याचे मुलीला व तिच्या आईला भासवले. त्या मुलीशी प्रेमसंबंध जुळवून नंतर तिच्याशी विवाह केला. त्याने त्या मुलीशी आर.के. नगरमध्ये घर घेऊन काही दिवस संसार केला. त्यावेळी त्याने मुलीला आपला पहिला विवाह झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मुलीला व तिच्या आईला धक्काच बसला.
ही घटना मार्च २०२० ते आतापर्यंत घडली. दरम्यानच्या कालावधीत त्याने मुलगी व तिच्या आईकडून गुळाच्या फॅक्टरीसाठी सहा लाख रुपये, घरखर्चासाठी दोन लाख रुपये फोन पेवरून घेतले. दिल्लीला कारखान्याचे सामान आणण्यास जाण्यासाठी म्हणून दोन वेळा ५० हजार रुपये, प्लॉट खरेदीसाठी १० लाख रुपये, आदी विविध कामांसाठी असे एकूण २९ लाख २५ हजार रुपये घेऊन त्याने फसवणूक केली आहे, अशी फिर्याद मुलीच्या आईने रविवारी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून विश्वनाथ घाटगे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.