कोल्हापूर : कोरोना आजार नियंत्रणासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आज, मंगळवारी सायंकाळी पाचनंतर संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण पहिल्याच दिवशी याला कमी प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद झाल्यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम राहिली.
कोरोनाचा पॉझिटिव्ही दर गेल्या आठवड्यात कमी झाल्याने सरकारने जिल्हा तिसऱ्या स्तरावर आणले. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेतील सरसकट दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर ग्राहक, दुकानदार, व्यापाऱ्यांना घरी जाण्यासाठी एक तासाचा वेळ दिला आहे. पाचनंतर संचारबंदी करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला, पण याची शहरात अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांची यंत्रणा कमी पडली. परिणामी वाहनांची वर्दळ कायम राहिली. विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांची संख्या रस्त्यावर होती.
लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारातील सर्व दुकाने बंद राहिल्याने शुकशुकाट होता. भाजी मंडईतही वर्दळ कमी राहिली. या परिसरात बंदसदृश्य स्थिती जाणवत होती. महापालिका चौक आणि शिवाजी रोडवरील औषधांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. पण या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक राहिली. राजारामपुरीत रुग्णालयाजवळ नातेवाईक गटागटाने थांबल्याचे दिसत होते. उद्यमनगरातील काही छोटे कारखाने चालू होते.
भवानी मंडप, अंबाबाई मंदिर परिसरात निरव शांतात होती. परिसरातील झाडांवर केवळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. महाव्दार रोडवरील सर्वच दुकानांना कुलूप होते. फेरीवालेही नसल्याने महाव्दार रोड निर्मनुष्य दिसत होता. शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ अशा निवासी भागात लोक दैनंदिन कामात व्यस्त होते. काही तरुण कट्यावर बसून मोबाईलवर मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ खेळण्यात मग्न होती.
चौकट
बिंदू चौकात दुचाकी जप्त
संचारबंदीमुळे बिंदू चौकात पोलिसांचे पथक विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी करीत होते. दुचाकी, चारचाकी अडवून कोठे जात आहात, कशासाठी बाहेर पडला आहात अशी चौकशी करीत होते. विनाकारण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांची दुचाकी जप्त केली जात होती. कारवाई चुकवण्यासाठी दुचाकीस्वार पर्यायी मार्गाने जात होते.
चौकट
बसस्थानक परिसर गजबजलेला
मध्यवर्ती बसस्थानकात अनेक बसेस ये-जा करीत होत्या. खासगी बसेसही पुणे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत होत्या. प्रवासी शोधण्यासाठी ट्रॅव्हल्स कार्यालयातील कर्मचारी बसस्थानक परिसरात मुक्तपणे फिरत होते. यामुळे संचारबंदी असतानाही बसस्थानक परिसर गजबजलेलाच राहिला.
फोटो : २००७२०२१-कोल- महाद्वार रोड बाजारपेठ
कोल्हापुरातील महाद्वार रोड बाजारपेठेत संचारबंदीमुळे मंगळवारी चारनंतर असा शुकशुकाट राहिला. (फोटो : नसीर अत्तार)