कोल्हापूर : शासन आदेश आणि जिल्हा नियोजन मंडळातून (डीपीडीसी) आवश्यक निधी उपलब्ध होऊनदेखील अद्याप विमानतळ उड्डाण क्षेत्रात आॅब्स्टॅकल लाईट (अडथळे दर्शविणारे दिवे) लावण्याचे काम पूर्ण झालेले नाही; त्यामुळे नाईट लँडिंग सुविधेचे काम अडले आहे. त्याचा फटका विमानसेवेला बसत आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून याबाबत लवकर कार्यवाही होणे आवश्यक आहे.विमानतळ विस्तारीकरणामधील विविध विकासकामांपैकी ‘नाईट लँडिंग सुविधा’ एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सुविधेसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १४० मीटर जागेचे सपाटीकरण, विमान उड्डाणक्षेत्रातील अडथळे दूर करणे अथवा त्यावर आॅब्स्टॅकल लाईट लावणे आवश्यक आहे. त्यातील जागेचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे.
काही अडथळे दूर केले आहेत; मात्र जे अडथळे दूर करता येणार नाहीत, त्यांवर आॅब्स्टॅकल लाईट लावले जाणार आहेत. त्याची पूर्तता राज्य शासनाकडून केली जाणार आहे. याबाबतच्या कामाचा शासनाने आदेश दिला आहे. त्यासह ‘डीपीडीसी’तून १४ लाखांचा निधीदेखील मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘महावितरण’च्या वतीने हे काम करण्यात येणार आहे. या कामाचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत १५ दिवसांमध्ये हे लाईट बसविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते; मात्र अद्याप त्या दृष्टीने काहीच झालेले नाही. नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूरच्या विमानसेवेला गती मिळणार आहे.काही अडथळे अजूनही कायमविमानतळाच्या विमानोड्डाण क्षेत्रात कळंबा येथील पॉवर ग्रिड, केआयटी कॉलेजच्या इमारतीचा डोम, चित्रनगरी ते पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या टेकडीवरील उंच झाडे, गोकुळ शिरगाव येथील कमान, मोबाईल कंपन्यांचे टॉवर, आदी स्वरूपांतील अडथळे आहेत.
कोल्हापुरातून मोठ्या विमानांचे उड्डाण होण्यासाठी हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत विमानतळ व्यवस्थापनाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात उड्डाणक्षेत्रात अडथळा ठरणारी उजळाईवाडी, कंदलगाव, आदी परिसरांतील झाडे तोडली आहेत; मात्र मोबाईल टॉवर, उंच इमारतींवर लाईट लावण्याचे काम झालेले नाही.
मग, विमान रद्द होणार नाहीसध्या मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम या विमानसेवेच्या वेळापत्रकावर होत आहे. कोल्हापूरमध्ये हे विमान येण्यास दीड ते दोन तासांचा विलंब होत आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून मुंबईला जाणारे विमानोड्डाण हे अंधुक प्रकाशामुळे रद्द झाले होते. ‘नाईट लँडिंग’ सुविधा उपलब्ध झाल्यास अशा प्रकारे विमान रद्द होणार नाही.
नाईट लँडिंग सुविधेसाठी आवश्यक असणारी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आॅब्स्टॅकल लाईट बसविण्याचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कामांना गती मिळणार आहे. ‘नाईट लॅँडिंग’चे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या परवान्यासाठी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविण्यात येईल.- कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ