कोल्हापूर : मुंबईतील हल्याबाबत धमकीचा मेसेज आला असला तरी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. असा कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही. याची काळजी पोलीस प्रशासन घेईल, याची मला खात्री असल्याची माहिती राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी. एन. पाटील यांच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात आयोजित केलेल्या सदभावना दौड कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दसरा चौक येथील शाहू बोर्डिंग हाऊस येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सदभावना ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तेथून मिरवणूकीने ज्योत दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील राजीव गांधी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर नेण्यात आली. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पी. पाटील, ॲड. सुरेश कुराडे, उद्योगपती व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव तौसिफ मुल्लाणी, तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील-वरणगेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, भारत पाटील-भुयेकर, धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.
पोलीस यंत्रणा अलर्टजी मुबारक हो, मुंबई मे ह मला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी २६/११ प्रमाणे हल्ल्याची धमकी रात्री ११ च्या सुमारास मिळाली असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचे 'लोकेशन ट्रेस' केल्यास ते भारताबाहेर असल्याचे आढळून येईल, असे मेसेंजरने सांगितले होते. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली आहे.