कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू झाले खरे; पण कोल्हापुरात त्याचे काहीही परिणाम निदान पहिल्या दिवशी तरी झालेले दिसले नाहीत. सरकारी कार्यालयातील गर्दी नेहमीप्रमाणे तुडुंब होती. ३१ मार्च ही आर्थिक वर्षाची सांगता जवळ आल्याने कोरोनाच्या भीतीपेक्षा कामाची पूर्तता महत्त्वाची असल्याने कार्यालये गजबजलेलीच होती. कामे करून देणारे व कामे घेऊन येणारेही काम कधी पूर्ण होईल, या विवंचनेत आहेत.
मंगळवारपासून राज्यभर निर्बंध लागू झाले आहेत. यात सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्याचे धाेरण निश्चित केले आहे. पण याची अंमलबजावणी पहिल्या दिवशी झाली नाही. नेहमीप्रमाणेच कर्मचारी कामावर आले. त्यामुळे नेहमीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन विभाग, करवीर तहसीलसह बहुतांश सरकारी कार्यालये गजबजलेलीच दिसली. महिनाअखेर असल्याने सर्वांवरच काम पूर्ण करण्याचा ताण आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या नियमामुळे याची पूर्तता करायची कशी, असा नवाच पेच समोर उभा ठाकला आहे.
महिनाअखेरमुळे आरटीओ विभागात कामाचा ढीग लागला आहे. परवाना नूतनीकरणाच्या कामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे येथे कामे करवून घेण्यासाठी अक्षरशा झुंबड उडाली आहे. जिल्हा परिषदेत या महिनाअखेरच्या आधी वैयक्तिक लाभाच्या योजनातील लाभार्थ्यांना खरेदी पावत्या जमा कराव्या लागणार आहेत. ठेकेदारांची बिले काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनांचा निधी खर्च करण्यासाठी, विविध याेजनांच्या लाभासाठी भेटीगाठी यामुळे जिल्हा परिषद हाऊसफुल्ल झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. वार्षिक आढाव्याची कामे असल्याने प्रत्येक विभागात लगबग सुरू आहे. तेथेही सरकारी निर्बंधाचा कुठे परिणाम झाला आहे, असे दिसले नाही.
चौकट ०१
सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव असल्याने कोणत्याही परिस्थितीत कामे करवून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. एकदाचा कोरोना परवडला; पण सरकारी बाबूगिरी नको. त्यामुळे तोंडाला मास्क लावतो, योग्य खबरदारी घेतो; पण कार्यालयात येऊन काम करवून घेतो, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.
फोटो: १६०३२०२१-कोल-कोरोना आरटीओ
फोटो ओळ: निर्बंध लागू झाले तरी प्रादेशिक परिवहन विभागात गर्दी काही कमी झालेली नाही. मंगळवारी दुपारी कार्यालय असेच तुडुंब भरलेले पाहून खरेच निर्बंध लागले का, हे पुन्हा एकदा तपासावे लागत होते. (छाया: नसीर अत्तार)