कोल्हापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान बेटिंगचा धंदा जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण, आदी पाच जिल्ह्यांतील क्रिकेट बेटिंगचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिली. टाकाळा येथे क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असताना राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तपासामध्ये कोल्हापूर ते मुंबईपर्यंत क्रिकेट बेटिंगचे कनेक्शन असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून तपास अधिकारी अमृत देशमुख यांना या गुन्ह्यातील मुुख्य सूत्रधार नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव याच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी जाधव याचा जामीन रद्द होण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. याच पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण जिल्ह्यांमध्ये काही दिवसांवर आलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान बेटिंगचा धंदा जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्णांतील पोलीस अधीक्षकांना क्रिकेट बेटिंगचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्णांत मटका, जुगार अड्डे पूर्णत: बंद करण्याचे आदेशही परिक्षेत्रातील पोलिसांना दिले आहेत. तरुणी व महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याची गांभीर्याने दखल घेत महिला छेडछाडविरोधी पथकाची स्वतंत्रपणे नियुक्ती केली आहे. कोल्हापूर शहरासह कराड, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड आदी परिसरामध्ये सावकारकीचे प्रस्थ वाढू लागले आहे. सावकारकीची माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये कोठे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजताच नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही रितेशकुमार यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
क्रिकेट बेटिंगचे अड्डे उद्ध्वस्त करा; पोलीस अधीक्षकांना आदेश
By admin | Published: February 10, 2015 12:13 AM