कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळील अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थ विक्रेता रणधीर भगवान चव्हाण (वय ३२, रा. हरिओमनगर, अंबाई टँक) याला मारहाण करून लुबाडल्याप्रकरणी सूरज शेट्टी (माजगावकर मळा), रूपेश पाटील (बलराम कॉलनी, सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत) या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांना शुक्रवारी हजर केले होते.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री खाद्यपदार्थांची गाडी लावण्याच्या कारणावरून विक्रेता चव्हाण आणि संशयित दोघांत वाद झाला होता. त्या वादातून त्यांनी चव्हाण यांना काठीने आणि दगडाने मारहाण करून दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि मोबाईल असा ४२ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. हरिओमनगर परिसरातील तीन चारचाकी आणि एका टेम्पोची तोडफोड करून दहशत माजविली होती. याप्रकरणी पोलिसांनी शेट्टी आणि पाटील या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी (रा. हरिओमनगर, सातवी गल्ली), इंद्रजित शेट्टी (रा. माजगावकर मळा, रंकाळा रोड) अद्याप दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.
- व्याजाच्या पैशासाठी तरुणास बेदम मारहाण, दोघा सावकारांना अटक
कोल्हापूर : कौटुंबिक अडचणीसाठी १५ टक्के व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी तरुणास गोखले कॉलेज परिसरात अडवून बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी दोघा सावकारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित आनंदा निवास सुतार (वय २९, रा. संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ), जयकुमार भारत ढंग (२४, रा. शास्त्रीनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, परेश सुरेश नायर (२६, रा. महालक्ष्मीनगर) याचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. कौटुंबिक अडचणीसाठी नायर याने संशयित पप्पू सुतार याच्याकडून १५ टक्के व्याजाने ३० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याच्याकडून कोरा धनादेश, स्टॅम्प लिहून घेतला. त्यानंतर नायर याने पैसे व व्याज असे २२ हजार ५०० रुपये सुतारला दिले होते. गाडी काढून घेतल्याने पुन्हा ३३ हजार रुपये दिले; परंतु संशयित सुतार व जय यांनी वारंवार नायर याच्या घरच्या लोकांना फोन करून पैशाची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी नायर हा गोखले कॉलेजच्या परिसरात असताना संशयित जयकुमार याने अडवून बेदम मारहाण करीत त्याचा मोबाईल काढून घेतला. भेदरलेल्या नायर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
- अज्ञात मोटारसायकल चालकावर गुन्हा
कोल्हापूर : संभाजीनगर येथील श्रीकृष्ण कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलने दिलेल्या धडकेत रुद्र राहुल पाटील (वय ४ वर्षे) जखमी झाला. हा अपघात २७ नोव्हेंबर रोजी झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, २७ नोव्हेंबर रोजी रुद्र हा शाळेतून घरी चालला होता. त्यावेळी मोटारसायकलने त्याला दिलेल्या धडकेत तो जखमी झाला. धडकेनंतर मोटारसायकलस्वार पळून गेला.
- शेतक-याचा मृत्यू
कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील विष प्राशन केलेल्या शेतकºयाचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संदीप दिनकर तिबिले (वय ३६) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी २६ नोव्हेंबरला विष प्राशन केले होते.
- महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : काळजवडे (ता. पन्हाळा) येथे विष प्राशन केलेल्या महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. रंजना संजय कांबळे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी २४ नोव्हेंबरला राहत्या घरी विष प्राशन केले होते.
- तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील विष प्राशन केलेल्या तरुणाचा ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाला. संकेत संभाजी चौगले (वय १८) असे त्याचे नाव आहे.
- अपघातात जखमी
कोल्हापूर : अंबप फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्रफुल्ल अनंत आडूस्कर (वय ४६, रा. अंबप) हे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी झाला. प्रफुल्ल यांच्या हात, पाय व डोक्याला दुखापत झाल्याने पेठवडगाव येथे प्राथमिक उपचार करून त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.