गणेश शिंदे -- कोल्हापूर --गतवर्षी गणेशोत्सवामध्ये ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या, विशेषत: डॉल्बी लावल्याप्रकरणी शहरातील ६२ गणेश तरुण मंडळांवर कारवाई झाली. त्यामध्ये अध्यक्षांसह ४१८ जणांवर गुन्हे दाखल होऊन संबंधित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा शहरातील काही मंडळांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिला असून, डॉल्बीमुक्तीच्या दिशेने कोल्हापूरची सकारात्मक वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या वर्षी शहरातील ८९९ तालीम मंडळे, तरुण मंडळांची नोंद पोलिस प्रशासनाकडे आहे. यापैकी ६२ मंडळांवर पर्र्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ सह ध्वनिप्रदूषण नियम २००० नुसार जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये कसबा बावडा , शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी परिसरासह आर. के. नगर, सुभाषनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, गजानन महाराजनगर, आदी उपनगरांतील गणेश तरुण मंडळांचा समावेश आहे. यंदा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून, ती ९२३ झाली आहे. गेली अनेक वर्षे पोलिसांसह सामाजिक संस्था डॉल्बीमुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत; पण यामध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. यंदा पोलिस यंत्रणेने मंडळांच्या बैठका घेऊन प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी तब्बल ६२ मंडळांवर कारवाई झाल्याने यंदा काही मंडळांनी स्वत:हून डॉल्बी न लावण्याची ग्वाही पोलिसांना दिली आहे. त्यामुळे ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची वाटचाल सकारात्मक दृष्टीने सुरू आहे. कायदा काय सांगतो....पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम २४ (२) प्रमाणे जर एखाद्याची कृती / कायद्याचे पालन न करणे याद्वारे प्रस्तुत कायद्याखाली तसेच इतर कायद्यांन्वये जर गुन्हा सिद्ध होत असल्यास ती व्यक्ती पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ खालील तरतुदीप्रमाणे शिक्षेस पात्र राहील. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये दोषी इसमास पाच वर्षे कैद व एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास व सदरची कृती सुरू राहिल्यास प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ (२) अन्वये अपराध सिद्धीनंतर एक वर्षापर्यंत वरील नियमाचा भंग / उल्लंघन करण्याचे सुरू राहिल्यास त्यास सात वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कडक कारवाई होणारच गेल्या गणेशोत्सव काळात ज्यांनी डॉल्बी लावला, त्यांचे डेसिबल तपासण्यात आले आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज व सरकारी पंच यामध्ये घेण्यात आल्याने मंडळांवर कडक कारवाई होणार हे नक्की आहे. ध्वनितरंग धोकादायक वैद्यकीय तज्ज्ञांचे मतअल्ट्रोसोनिक आवाजांचे रूपांतर डिजिटलमध्ये होते. त्यात चुंबकीय ध्वनी लहरी मोठ्या प्रमाणात असतात. डेसिबल नियमित चढ-उतारात काम करते. मात्र, डॉल्बीमुळे डेसिबल सरळ रेषेत निर्माण होते. या ध्वनिलहरीमुळे हृदयविकाराचा झटका येणे, दरदरून घाम येणे, बहिरेपणा येणे, रक्तदाब वाढणे या समस्यांना सामोरे जावे लागते. - डॉ. अर्जुन आडनाईक, हृदयविकार तज्ज्ञडॉल्बीमुळे कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. पडदा नाजूक असल्याने तो प्रसंगी फाटू शकतो. त्यात शस्त्रक्रियेद्वारे सुधारणा करता येते. मात्र, कानाच्या आतील आंतर पटलास तीव्र आवाजाच्या ध्वनिलहरींमुळे इजा झाल्यास काहीच करता येत नाही. तीव्र ध्वनी तरंगांमुळे निरोगी माणूस रोगी बनू शकतो.- डॉ. चेतन घोरपडे- सहयोगी प्राध्यापक, शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयआज नांगरे-पाटील संवाद साधणारडॉल्बीमुक्तीची घेतली जाणार शपथकोल्हापूर : आगामी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी तालीम व मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांशी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील सुसंवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून डॉल्बीमुक्तीची शपथ घेतली जाणार आहे. आज, बुधवारी दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, शहर उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे अमरसिंह जाधव, निरीक्षक तानाजी सावंत, अशोक धुमाळ, अनिल देशमुख, प्रवीण चौगुले, अमृत देशमुख उपस्थित राहणार आहेत.
मंडळांचा निर्धार; यंदा डॉल्बी नाय लावणार
By admin | Published: August 24, 2016 12:10 AM