कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूकीत हमखास डॉल्बीच्या भिंती उभ्या करुन दणदणाट करणाºया दादा अर्थात मोठ्या मंडळांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गणेशोत्सवात डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून तटाकडील तालीम मंडळ, हिंदवी स्पोर्टस, बीजीएम स्पोर्टस, उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळ, श्री साई मित्र मंडळ, दत्त भक्त मंडळ, संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळ, रंकाळावेश तालीम मंडळ, आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या नाळे कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेत डॉल्बी न लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
गेले अनेक वर्षे गणेशोत्सव मिरवणूकीत काही मंडळे डॉल्बी लावून सर्वांचे लक्ष वेधत होते. मात्र, डॉल्बीच्या दणदणाटामुळे परिसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्यांनाही नागरीकांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच उच्च न्यायालयाने डॉल्बीवर बंदी घालत त्याची डॉल्बीच न लावू देण्याचे सरकारला निर्देश दिले. त्यातूनही जर डॉल्बी वाजलाच तर मंडळाबरोबरच पोलीस प्रशासनातील अधिकाºयांवरही कडक कारवाईचे संकेत दिले. त्यामुळे सरकारने मंडळांना डॉल्बीच न लावू देण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार कोल्हापूरातही त्याची कडक अंमलबजावणी केली. यात प्रत्येक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत डॉल्बीचा दणदणाट करणारी मंडळे पारंपारीक म्हणून प्रसिद्ध होती. त्यात तटाकडील तालीम मंडळ, हिंदवी स्पोर्टस, बीजीएम स्पोटर्स, उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळ, साई मित्र मंडळ, दत्त भक्त मंडळ, संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळ आदींचा समावेश होता.
डॉल्बी न लावण्याविषयी या मंडळांच्या कार्यकर्त्यांचे ‘ ब्रेन वॉश’ अर्थात प्रबोधन पोलीस प्रशासनकडून गेले काही दिवस सुरु होते. त्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकार म्हणून हस्तक्षेप करीत मंडळांना गेले दोन दिवस भेट देत त्यांचे प्रबोधन केले. त्यानूसार गुरुवारी या मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यां्नी पालकमंत्री पाटील यांच्या नाळे कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेऊन डॉल्बी न लावण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिठाई भरवुन या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी पाटील म्हणाले, डॉल्बी न लावल्याने जर कार्यकर्त्यांचा उत्साह हरवणार असेल तर त्यासाठी वेगळ्या पर्यायी वाद्यांची मंडळांनी तरतुद करावी. त्यासाठी लागणारा खर्च मी देतो. यासह दिर्घ काळ अशी टिकणारी मदत माझ्यातर्फे तालीम मंडळांना देऊ. जसे शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ या मंडळांसारख्या उत्कृष्ट इमारती त्यात्या तालीम मंडळांना बांधून देऊ.
कोल्हापूरातील सर्व तालीम मंडळे स्व जागेत व सुस्थितीत राहतील यासाठी लागणारा खर्च आपण करण्यास तयार आहोत. याकरीता केवळ मंडळांनी स्व:ताची जागा दाखविणे आवश्यक आहे. त्यावर बांधकामाचा खर्च मी किंवा प्रायोजक देऊन ते पुर्ण करुन देण्याची माझी जबाबदारी राहील. तरी मंडळांनी दिर्घकाळ लागणाºया गोष्टींसाठी हट्ट करावा. डॉल्बीसारख्या आरोग्य बिघडवणाºया गोष्टींकडे लक्ष देऊ नये. जो कायदा मोडेल त्याच्यावर कायद्याने कडक कारवाई केली जाईल.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व तटाकडील तालीमचे अध्यक्ष महेश जाधव, संतोष लाड (अप्पा),शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ व मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा राहणार
न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाहीले जाते. मी स्वत: डॉल्बीला विरोध करुन मी तुमच्या आनंदावर विरंजन घालत नाही. मला केवळ सरकारचा प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायचे आहे. नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणाºया व घातक अशा डॉल्बीला विरोध कायम राहील. डॉल्बी लावून कायदा मोडणाºयाविरोधात कारवाई व कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून पोलीस विभागाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यात मग तो माझा शिपाई असो वा उच्च अधिकारी असो त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे.
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार ’नाही
भेटी दरम्यान उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळाने तालीमीच्या वरील मजल्याचे बांधकामासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यास अनुसरुन पालकमंत्री पाटील यांनी मटेरियल व मजूरी मी देतो. तत्काळ कामाचे इस्टीमेट आणि कॉन्ट्रॅक्टर आणा ’ असे सांगितले. त्यातून चर्चेतून पुन्हा पालकमंत्री म्हणाले, तत्काळ काम सुरु करा . कारण आमदार निधीतून या कामांसाठी फार वेळ लागतो, यासाठी अनेक प्रोसेस आहे. त्यातून ते मंजूर कधी होईल ते सांगता येत नाही. त्यावर उपाय म्हणून मी तुम्हाला त्या बांधकामांसाठी आवश्यक ती मदत देतो. प्रत्येक शनिवारी तेथील मजुरीचे पेमेंटही भागवितो असे कार्यकर्त्यांना उत्तर दिले. त्यांनी मी तत्काळ निर्णय घेतो. कारण ‘ आयजीच्या जीवावर बायजी उदार ’ असले काही करीत नाही. तर बीजीएम स्पोर्टसनेही यावेळी मंडळाला इमारत नसल्याचे सांगितले. यावरही पाटील म्हणाले, तुमच्या मंडळाची जागा दाखवा तत्काळ बांधकामाला उद्यापासून सुरुवात करु, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.पालकमंत्र्यांचा यावर भर
- तरुणांचा उत्साहासाठी अन्य पर्यायी वाद्यांचा खर्च देण्याचे आश्वासन- जिल्ह्यातील १०० हून अधिक तालीम मंडळांना दिर्घकाळ अशी मदत देणार . यात मंडळांच्या इमारती बांधून देण्याची ग्वाही.-डॉल्बी विरोधी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसार कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.अंमलबजावणी करणाºया पोलीस यंत्रणेच्या पाठीशी सरकार राहणार.
पोलीस बंदोबस्त अन्् उत्सुकता
दरवर्षी विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी लावणारी मंडळे पालकमंत्री पाटील यांच्या डॉल्बी न लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉल्बी लावणार नाही असे सांगण्यास येणार म्हणून परिसरात पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यात स्वत: उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जुनाराजवाडा निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्यासह शीघ्र कृती दलाचे जवान, असे शंभरहून अधिक पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १:३० पर्यंत नाळे कॉलनी परिसरात एवढा मोठा पोलीस बंदोबस्त कशाबद्दल अशी उत्सुकता नागरीकांमध्ये होती. मंडळाचे कार्यकर्ते व पालक मंत्री यांनी संवाद साधल्यानंतर काही प्रमाणात परिसरात पसरलेला तणाव निवळला.मंडळांची ही मंडळी उपस्थित होती
तटाकडील तालीम मंडळ उपाध्यक्ष राजू (एनडी) जाधव, भाऊ गायकवाड, महेश गुरव, संदीप निकम, साई मित्र मंडळचे उपाध्यक्षअमित बोरगावकर, गोरखनाथ सुतार, स्वप्निल सुतार, शंकर सुतार, हिंदवी स्पोर्टसचे उपाध्यक्ष अमोल माने, बाळासाहेब माने, विकास पाटील, प्रशांत मोरे, धनंजय सावंत, बीजीएम स्पोर्टसचे अमर माने, भानुदास इंगवले, अभिजीत कडोलीकर, राजेंद्र ढेंगे,दत्त भक्त मंडळाचे अध्यक्ष विजय यादव, लखन खानोलकर, प्रसाद पालकर, शुभम गायकवाड, संयुक्त रविवार पेठकडून सुधीर खराडे, आदी मंडळी उपस्थित होते.डॉल्बीपासून मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे आमचे मंडळ यंदापासून डॉल्बी लावणार नाही.- महेश जाधव,अध्यक्ष , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व तटाकडील तालीम वाघाची तालीम मंडळाचे ३००० हून अधिक कार्यकर्ते आहेत. आम्ही प्रत्येक वर्षी गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी लावत होतो. पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी डॉल्बीपासून आरोग्याला धोका आहे.याबाबत प्रबोधन केले. त्यानूसार आमच्या तालीमीच्या अंतर्गत परिसरातील ५२ मंडळेही डॉल्बी लावणार नाहीत.- योगेश येळावकर,अध्यक्ष , उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळ,
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी लावणार नाही. उत्साही कार्यकर्त्यांसाठी अन्य पर्यायी पारंपारीक वाद्ये वाजवू. दादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही कायदा पाळू.-अशिष भोईटे , बीजीएम स्पोर्टस,पालकमंत्री दादांच्या शब्दाला जागून आम्ही यंदा डॉल्बी लावण्याचे धोके ओळखून पारंपारिक वाद्यांच्या कडकडाटात आम्ही यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक काढणार आहोत.- सुदर्शन सावंत,अध्यक्ष, हिंदवी स्पोर्टस,