इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. आवाडे यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत हा उपक्रम राबविला. यामध्ये शहर परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.
पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे इचलकरंजी शहरासह नदीकाठच्या गावांना ‘नदी उशाला, कोरड घशाला’ अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावे, शहरे यांनी अन्य नद्यांमधून पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटविला असला तरी शेती व जनावरांना पंचगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. परिणामी, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर शासनाकडून जुजबी कारवाई होत असल्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्ती निर्धार समितीच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती सुरू केली आहे. त्यानुसार माजी मंत्री आवाडे यांनी शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रदूषणमुक्तीचा निर्धार करण्याचे ठरविले. शुक्रवारी आवाडेंच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींना सोबत घेऊन नदीवेस नाका ते पंचगंगा नदीघाट अशी पदयात्रा काढण्यात आली.
नदीघाटावर सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आवाडे यांनी उपस्थित सर्वांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसदर्भात माहिती देऊन सर्वांनी एकसंघपणे हा प्रश्न सोडवूया, असे आवाहन केले.यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शार्दुल शेटे, पंढरीनाथ ठाणेकर, प्रकाश सातपुते, किशोरी आवाडे, नंदा साळुंखे, राहुल आवाडे, नजमा शेख, मंगल सुर्वे, शहाजहान मुजावर, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, आदींसह नगरसेवक-नगरसेविका तसेच चंदूर, कबनूर, तारदाळ, रेंदाळ, खोतवाडी, हुपरी या परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.रॅलीत जनजागृतीचे फलक‘पदयात्रेमध्ये पावसात पडतात गारा, पंचगंगा नदीमध्ये कचºयाला देऊ नका थारा’, ‘जल हेच जीवन, जल हीच शक्ती’, ‘आमचा निर्धार फक्त पंचगंगा प्रदूषणमुक्त’ असे फलक दर्शवत पंचगंगा प्रदूषणमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येत होते.जनजागृतीसाठी पथनाट्येपंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती होण्यासाठी शहरातील वॉर्डांमध्ये दररोज पथनाट्ये सादर केली जात आहेत. त्या माध्यमातून प्रदूषणाची कारणे, टाळण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जात आहे.