कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भाग निश्चित करून त्याची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी (दि. ३०) येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता आणि निवडणूक कामकाजाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी प्रमुख उपस्थित होते.राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, आयकर या यंत्रणांकडून तसेच खर्चविषयक भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक यांच्यामार्फत निवडणूक काळात रोकड, मद्य, भेटवस्तूंचे कसल्याही परिस्थितीत वाटप होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च समित्यांनी काटेकोरपणे कामकाज करावे, लोकसभा निवडणूक नि:पक्ष आणि भयमुक्त वातावरणात व्हावी, याबरोबरच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्र्चाबाबतही खर्च समित्यांनी अधिक दक्षता घेऊन काम करावे. तसेच निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे जिल्ह्यात काटेकोर पालन करण्यावर सर्व पथकांनी तसेच शासकीय यंत्रणांनी अधिक भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.‘स्विप’ उपक्रमाच्या साहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी कृती आराखडा तयार करावा. जिल्ह्यात गावनिहाय मतदार जनजागृतीचा कार्यक्रम राबवावा, अशा सूचना देऊन यामध्ये पथनाट्य, गृहभेटी, चुनाव पाठशाला याबरोबरच बहुरूपी, तृतीयपंथीय यांचेही मतदान जागृतीसाठी सहकार्य घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व सहायक निर्णय अधिकारी तसेच सर्व पथकांचे नोडल अधिकारी, विविध पथकप्रमुख व समन्वय अधिकारी उपस्थित होते.