कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांना सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्यय येत आहे; हे निषेधार्ह असल्याचा आरोप करीत, इथून पुुढेही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी येथे दिला.मंगळवारी मागण्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.दुपारी बाराच्या सुमारास महावीर उद्यान येथून नेहरू युवा देवदासी मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली देवदासींच्या मोर्चाला सुरुवात झाली.
हयातीचे दाखले देण्याची अट रद्द करा, पेन्शन प्रस्ताव त्वरित मंजूर करा, असे विविध फलक घेतलेल्या देवदासींचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.यावेळी भंडारे म्हणाले, देवदासींच्या प्रश्नांवर वर्षानुवर्षे रस्त्यांवर येऊनही राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल.यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये देवदासींच्या मागण्या मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत तीन वेळा बैठक घेतली. परंतु त्यातून आश्वासनाशिवाय काहीच निष्पन्न झालेले नाही.
पालकमंत्र्यांना देवदासींच्या मागण्यांबाबत प्रस्ताव सादर करूनही त्यांनी चर्चेसाठी एक तासाचा वेळही दिलेला नाही. या उलट पुणे, कोल्हापुरातील एका तथाकथित संस्थेच्या सुमारे ५०० देवदासींना राजकीय वरदहस्ताने व राजकीय दबावाने नुकताच ‘संजय गांधी निराधार योजने’चा व श्रावणबाळ सेवा राज्य अनुदान योजनेचा लाभ सुरू करण्यात आला आहे.आंदोलनात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, देवताई साळोखे, रेखा वडर, द्रौपदी सातपुते, नसीम देवडी,यल्लवा कांबळे, शांताबाई पाटील, शारदा अवघडे, लक्ष्मी साठे, मुनाफ बेपारी, शिवाजी शिंगे, आदी सहभागी झाले होते.