कोल्हापूर : दलित समाजातील देवदासींना १५०० रुपये पेन्शन मंजूर व्हावी, वयाची अट रद्द करून देवदासी महिलांचे सर्वेक्षण व्हावे, त्यांच्या घरकुल मागणीचा प्रस्ताव मंजूर करावा, देवदासींना पिवळे रेशनकार्ड मिळावे, अशा विविध मागण्या गेली २५ वर्षे राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ देवदासींनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पावसाळी अधिवेशनापूर्वी मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला. दुपारी बाराच्या सुमारास माजी नगरसेवक अशोक भंडारे व माजी नगरसेविका माया भंडारे यांच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत देवदासींचा मोर्चा चिमासाहेब महाराज चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. अशोक भंडारे व माया भंडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. किती मोर्चे काढायचे, देवदासींचे प्रश्न सुटणार आहेत की नाही? अशी विचारणा करत यासाठी बैठक बोलवावी, अशी मागणी भंडारे यांनी केली. यावर या प्रश्नावर ७ जूनला सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.निवेदनातील मागण्या अशा, सध्या देवदासींना ६०० रुपये पेन्शन मिळते, ती १५०० रुपये करावे, देवदासींना घरकुलासाठी २ जुलै २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तो त्वरित मंजूर करावा, देवदासींना वयाची अट रद्द करावी, पेन्शन लागू असलेल्या मयत देवदासींच्या मुलींना ही पेन्शन लागू करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात देवाताई साळोखे, रेखा वडर, रखमाबाई पाटील, मालन आवळे, सखुबाई अवघडे, शांता माने, यल्लवा वाघमारे, शोभा कांबळे, आक्काताई कांबळे, सुभद्रा गायकवाड, नसिमा देवडी आदी सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
देवदासींचा धडक मोर्चा
By admin | Published: May 21, 2016 12:01 AM