लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धरणासाठी घर, जमीन, जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होणारी मनं, जाताना जिव्हाळ्याच्या जनावरांची सोबत हवी असतेच; पण त्यात वांझोटी जनावरं काय कामाची? ही भावना दृढ होऊन जंगलात सोडून दिलेल्या म्हशी रानटी झाल्याने मालक देवाप्पा व त्यांच्यातील होणारा संघर्ष याचा धांडोळा घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
चांदोली धरणाच्या निर्मितीवेळी झोळंबी आणि परिसरातील विस्थापित गावांच्या मनाचा मागोवा घेणाऱ्या, विस्थापितांची परवड वाचकांच्या मनावर खोलवर रुजवणाऱ्या खोत यांच्या या कादंबरीने साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवत मराठी साहित्यात मानाचे पान जोडले आहे. खोत यांच्यासह आतापर्यंत कोल्हापूर जिल्हातील आठ साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला आहे.भारतातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्य रचनांसाठी बुधवारी साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी दिल्लीत पुरस्कारांची घोषणा केली. गोव्यातील कोकणी साहित्यिक प्रकाश पर्येकार यांना ‘वर्सल’ या कथासंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला. १२ मार्च २०२४ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होईल.
निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले खोत हे कळे विद्यामंदिर येथे शिक्षक आहेत.
हा पुरस्कार म्हणजे विस्थापितांचा आवाज आहे. जबाबदारीने लिहिणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येक सृजनशील व्यक्तीची दखल घेणे, हेच खरे समाजहित आहे. मानव व पर्यावरण यांच्यातील संघर्ष कादंबरीत मांडला आहे.- कृष्णात खोत, लेखक