पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीचा अपेक्षित आदेश बुधवारी रात्री न्याय व विधि खात्याने दिल्यानंतर कोल्हापुरात आता अंबाबाई मंदिर समितीचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. अंबाबाईला २०१७ साली घागरा चोली नेसविल्याच्या प्रकारानंतर कोल्हापूरकरांनी दिलेल्या लढ्याची परिणती म्हणून अवघ्या नऊ महिन्यांत भाजप-शिवसेना सरकारने अंबाबाई मंदिर समिती कायदा केला. त्यानुसार मंदिर देवस्थान समितीपासून वेगळे करण्यात येणार असून, त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाणार आहे; पण कायद्याची अंमलबजावणी गेली साडेतीन वर्षे झालेली नाही.
कायदा करून आंदोलकांना शांत करण्यात आले. दुसरीकडे पुजाऱ्यांचीही बाजू सांभाळत कायदा फाईल बंद ठेवण्यात आला. आता देवस्थान समिती बरखास्त झाली असून, त्यावर नव्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागेल; पण अंबाबाई मंदिराच्या कायद्याचे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला आहे. यावरही महाविकास आघाडीने त्वरित निर्णय घेऊन कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
---