कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नी सुनावणीसाठी दि. २ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली. मंगळवारी सचिव विजय पोवार अनुपस्थित राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने २००६ रोजी भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांनी नोकरीत कायम, कामगार कायद्यानुसार वेतन आणि फरक मिळावा, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर देखील देवस्थानने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दाद मागितली होती. त्यात १८ कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर नोकरभरतीचा मुद्दा घालण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणाची सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार देवस्थान समिती व सुरक्षा रक्षक यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. सचिव विजय पोवार यांना मंगळवारी म्हणणे मांडायचे होते. मात्र ते रजेवर असल्याने सहसचिव शीतल इंगवले व अन्य कर्मचारी सुनावणीला उपस्थित होते. त्यांना या प्रकरणात काही सांगता आले नाही. त्यामुळे सुनावणीसाठी दि. २ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली. त्या दिवशी सचिवांना देवस्थानचे म्हणणे मांडायचे आहे.