म्हाकवे : स्वकमाईतील धन आणि ध्येयासक्तीच्या जोरावर पद्मभूषण देवचंदजी शाह यांनी सीमाभागातील गरीब मुलांच्या उच्चशिक्षणाची सोय केली. त्यामुळे त्यांना ‘देवाघरचा चंद्र’ ही दिलेली उपमा सार्थ आहे. तब्बल ४५ एकरांत लावलेल्या देवचंद काॅलेजच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यातूनच देवचंदजी यांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी काढले. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात पद्मभूषण देवचंदजी शाह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रकाश शाह होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कमला हर्डीकर उपस्थित होत्या.
स्व. देवचंदजी शाह यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या जडणघडणीत पत्रकारांचेही योगदान आहे. याबाबत कृतज्ञता म्हणून सीमाभागातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांनी प्रास्ताविकात ६० वर्षांच्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी प्रसिद्धी विभागातील वृत्तपत्र कात्रण संग्रहाचे प्रकाशन झाले. उपप्राचार्या कांचन बिरनाळे-पाटील, प्रा. शेषगिरी कागवाडे, निवृत्त प्रभारी प्राचार्य प्रकाश शहा, प्रा. सुहास निव्हेकर, प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. आनंद संकपाळ, रमेश देसाई यांच्यासह देवचंद महाविद्यालय, मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह कॉन्व्हेंट, आयटीआयमधील शिक्षक उपस्थित होते. प्रा. सुजाता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय केला. प्रा. डॉ. सुषमा जाधव-लिमकर यांनी आभार मानले.
शाह यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी...
स्व. देवचंद शाह हे त्याग, दान, निगर्वी, साधेपण जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ज्ञानमंदिर उभारून सीमाभागातील शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. हयातभर त्यांनी अधात्म व योगाला महत्त्व दिले. आजच्या तरुणांनीही दूरदृष्टी ठेवून त्यांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करावी, असे आवाहन डॉ. कमला हर्डीकर यांनी केले.
फोटो १९ देवचंद कॉलेज
अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात देवचंद शाह यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना डॉ. व्ही. एन. शिंदे, कमला हर्डीकर, प्राचार्य पी. एम. हेरेकर.