कोल्हापूर : ग्रामपंचायत हद्दीतील ३२२९.१७ चौरस फुटाच्या बांधकामासाठी आता ग्रामपंचायतीची परवानगी लागणार नाही. मात्र त्यासाठी विकास शुल्क आणि उपकर भरावा लागणार आहे. त्याचे दर ग्रामविकास विभागाने गुरुवारी जाहीर केले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १२ मार्च रोजी लवकरच शुल्क दर जाहीर करू, असे सांगितले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरविकास विभागाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील बांधकामाबाबतही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता ग्रामपंचायत हद्दीतील ३२२९.१७ चौरस फूट म्हणजेच ३०० चौरस मीटर बांधकाम करण्यासाठी आता परवानगी गरज नाही.
चौकट
ही कागदपत्रे आवश्यक
जरी परवानगीची गरज नसली तरी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. ग्रामपंचायत या कागदपत्रांची तपासणी करणार आहे.
१ जागेच्या मालकीची कागदपत्रे
२ मंजूर ले-आउट
३ इमारतीचा नियोजित आराखडा
४ विकास शुल्क, उपकर ग्रामपंचायतीकडे भरल्याची पावती
५ आर्किटेक्टचा विहित नमुन्यातील दाखला
चौकट
विकास शुल्क व कामगार उपकराचा दर खालीलप्रमाणे
१ जमीन विकास शुल्क
अ रहिवास भूखंड क्षेत्रासाठी जमिनीच्या रेडीरेकनर दर प्रति चौ.मी. दराच्या १/२ टक्के
आ वाणिज्य भूखंड क्षेत्रासाठी जमिनीच्या रेडीरेकनर दर प्रति चौ.मी. दराच्या १ टक्के
२ बांधकाम विकास शुल्क
अ रहिवास भूखंड क्षेत्रासाठी जमिनीच्या रेडीरेकनर दर प्रति चौ. मी. दराच्या २ टक्के
आ वाणिज्य भूखंड क्षेत्रासाठी जमिनीच्या रेडीरेकनर दर प्रति चौ.मी. दराच्या ४ टक्के
हे सर्व शुल्क ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये जमा करावयाचे आहे.
३ कामगार उपकर
बांधकामाच्या किमतीच्या १ टक्के
हा निधी कामगार विभागाकडे जमा करण्यात यावा.