कोल्हापूर : शाहूप्रेमींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सामाजिक न्याय विभागाने शाहू समाधिस्थळाची जागा नावावर असण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ रुपये निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.या कामासाठी समाधिस्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावे नसणे या तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू झालेले नव्हते. ही अट सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने शिथिल केली आहे. त्यामुळे शाहू समाधिस्थळाचे विकासकाम कोल्हापूर महापालिकेद्वारे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देतील.यामुळे कोल्हापूर व महाराष्ट्रातील शाहूप्रेमींच्या आणि संपूर्ण बहुजन समाजाच्या जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. खऱ्या अर्थाने शाहू महाराज यांचे समाधिस्थळाचे सुशोभीकरण करण्याच्या कामास गती येणार आहे. तसेच या समाधिस्थळाच्या संपूर्ण कामकाजावर जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या पर्यवेक्षणाखाली काम सुरू होऊन ते पूर्ण करून घेण्यात येणार आहे.विषय मार्गी या विषयावर तोडगा निघाला नाही तर शाहू स्मृतिदिनी नेत्यांना शाहू समाधिस्थळी येऊ देणार नाही असा इशारा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीने दिला होता. त्याबाबतचे निवेदन ही शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत हा विषय मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते. पण शुक्रवारीच हा विषय मार्गी लागला.
Kolhapur News: शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ९ कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 1:10 PM