सुखांच्या परिभाषाही संकुचित ठराव्यात एवढ्या नैसर्गिक जैवविविधतेने नटलेल्या पाटगाव परिसराचा विकास नवा अध्याय लिहिणारा असेल, असे उद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिवाजीनगर पाटगाव येथे डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग हडकर होते.
आमदार आबिटकर म्हणाले, प्रत्येकाच्या मनामनांत असणाऱ्या आणि सामान्यांना असामान्य वाटणाऱ्या शिवाजीनगर रस्त्याचे काम आपल्या हातून घडले याचा मनस्वी आनंद होत आहे. पाटगाव प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या लोकांच्या त्यागामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रकल्पांतर्गत गेलेल्या जमिनींना योग्य मोबदला मिळवून देणे तसेच पुनर्वसित लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. या परिसरातील रांगणा किल्ला, मौनी जलाशय, मौनी मठ तसेच पाटगाव परिसराचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे या परिसरातील जमिनीचे मोल लक्षात घेऊन जमिनी न विकण्याचे आवाहनही आबिटकर यांनी केले. या वेळी एम. जी. लाड, रावजी लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे,संदीप वरंडेकर, संग्राम सावंत, सरपंच विलास देसाई, उपसरपंच महेश पिळणकर,मधुकर लाड ,पांडुरंग लाड,रामचंद्र लाड,उत्तम हडकर, विठ्ठल हडकर,नंदकुमार ठाकूर, आप्पा ठाकूर गोविंद पिळणकर, अनिल सावंत, अस्मिता वर्दम, विजेता मसुरेकर, भगवान पाटील, मंदार म्हाडगुत उपस्थित होते. रत्नाकर लाड यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक मधुकर लाड यांनी केले.
फोटो : शिवाजीनगर पाटगाव येथे डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. या वेळी उपस्थित बाबा नांदेकर, प्रकाश पाटील आदी.