भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर केंद्र शासनाच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दत्तक घेतलेल्या चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गावामध्ये वर्षभरात केवळ योजनेच्या प्रारंभाचा ‘नारळ’च फुटला आहे. विकास आराखडा तयार करण्यातच वर्ष सरले आहे. खासदार महाडिक यांनी प्रारंभ कार्यक्रमानंतर पुन्हा गावाला भेट देण्याची तसदी घेतलेली नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही प्रत्यक्ष विकासकामांना अजून सुरुवात झालेली नाही. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि कर्नाटकच्या सीमेजवळ राजगोळी खुर्द गाव आहे. राजेवाडी, गणेशवाडी, चन्नेटी अशा वाड्या राजगोळी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये येतात. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये हेमरस साखर कारखाना आणि हिंदुस्थान पेपर मिल असे दोन मोठे औद्योगिक प्रकल्प असल्यामुळे उत्पन्न वाढले आहे; परंतु, तीन वाड्या आणि मुख्य गाव असा विस्तार असल्याने सर्वांगीण विकासाचे ध्येय गाठताना दमछाक होत आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने सहा महिन्यांत रस्त्यांची दयनीय अवस्था होते. गावातील अंतर्गत रस्ते सिमेंटचे आहेत; मात्र एकाही गल्लीत गटारींची चांगली व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. अनेक ठिकाणी गटारींतच पाणी तुंंबून राहते. काही भागांत मध्यवस्तीमध्येच जनावरांचे शेण टाकण्यासाठीचे उकिरडे आहेत. ग्रामपंचायतीची इमारत जुनीच आहे. मूलभूत समस्यांची वानवा आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे गाव ठोस विकासापासून अनेक वर्षांपासून वंचित राहिले. निवडणुकीत मते मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी पुन्हा दुसऱ्या निवडणुकीतच दर्शन देतात, अशा ग्रामस्थांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदार महाडिक यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे कळल्यानंतर रहिवाशांच्या अपेक्षा उंचावल्या. गावचा चेहरामोहरा बदलणार, सर्वांगीण विकास होणार असे स्वप्न रहिवाशांनी पाहिले. ६ जानेवारी २०१५ रोजी योजनेच्या उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास खासदार महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, चार्ज आॅफिसर व गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह जिल्हा पातळीवरचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर खासदार महाडिक, आमदार कुपेकर यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी म्हणून गावाला भेट देऊन लोकसहभाग वाढविण्यासाठी, विकास आराखडा तयार करण्यासाठीची स्वतंत्र बैठक घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गावपातळीवर वेळोवेळी बैठका घेऊन जागृती केली आहे. ग्रामविकास आराखडा तयार केला आहे; पण वर्ष उलटले तरी योजना मात्र जागृती, सर्व्हे, विकास आराखडा, प्रशिक्षण या टप्प्यांतच आहे. प्रत्यक्षात सर्वांगीण विकासाचा नारळ अजून फुटलेला नाही. विकास आराखड्यात महत्त्वाची कामे अशी पाणंद रस्ते, मुख्य रस्ते, घटप्रभा नदीवर नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, गटारी बांधकाम, ग्रामसचिवालय, व्यायामशाळा, बसथांबा, ग्रंथालय, वाचनालय, अंगणवाडी , रुग्णालय सांस्कृतिक भवन, समाजमंदिर, मंगल कार्यालय यासाठी इमारत , सांडपाणी व्यवस्थापन, जलस्रोत मजबुतीकरण करणे, स्मशानभूमीचे बांधकाम करणे, घनकचरा व्यवस्थापन, संपूर्ण गावात वायफाय नेटवर्क, छोटे लघुउद्योग, पदवी महाविद्यालय, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणे. वर्षात काय काम झाले ? जागृतीसाठी विद्यार्थ्यांची गावातून फेरी, विकासासंबंधी ग्रामसभेत चर्चा, महिला ग्रामसभा व युवक मेळाव्याचे आयोजन, सांस्कृतिक आणि विविध खेळांच्या स्पर्धा, आदर्श गाव कसे असावे यावर निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, पशुचिकित्सा शिबिर, रोजगार दिवस असे उपक्रम घेण्यात आले. राजगोळी धनंजय महाडिक
विकास आराखड्यातच सरले वर्ष,
By admin | Published: May 26, 2015 12:12 AM