शाहू मार्केट यार्ड मध्ये सुमारे २४ वर्षांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदायातील दत्ताजीराव वारके तसेच त्यांचे सहकारी सुनील कोळी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधून विठ्ठल-रुक्मिणी सांस्कृतिक व सार्वजनिक मंडळाची स्थापना केली. आषाढी कार्तिकी वारीसाठी जिल्ह्यातून व कोकणातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्या जाता येता येथे मुक्कामी असतात. त्यांना मंडळामार्फत मोफत अन्नदान केले जाते. मंदिराचा परिसर वीस गुंठे असून प्रत्येक वर्षी तुकाराम बीज, ज्ञानेश्वर समाधी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण असे भव्य सोहळे मंडळामार्फत आयोजित केले जातात. या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दरवर्षी उभारल्या जाणाऱ्या मंडपावर हजारो रुपये ट्रस्ट मार्फत खर्च केले जातात. प्रत्येक वर्षी होणारा हा खर्च वाचवून त्याचा जनतेसाठी उपयोग व्हावा म्हणून मंदिर परिसरामध्ये कायमस्वरूपी मंडप उभारणे गरजेचे आहे. मंदिरातील नेहमीच्या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर वेळी या हॉलचा वापर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वाचनालय अशा विविध प्रकारे करून त्यांचे करिअर घडविण्यासाठी होऊ शकतो. धडाडीचे निर्णय घेण्यात हातखंडा असलेल्या पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी या मंदिराच्या विकासासाठी १५ लाख रुपये देण्याची घोषणा यापूर्वी अनेकवेळा जाहीरपणे केली आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही अथवा प्रगती न झाल्याने लोकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच बरोबर मंदिर परिसराच्या विकासामध्ये मार्केट कमिटीमार्फत निधी उपलब्ध करून सहभाग घेतल्यास या कामाला गती येऊ शकते अशी लोकांची अपेक्षा आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरील मुख्य मार्गावर असणाऱ्या या मंदिराचा विकास केल्यास पर्यटकांसाठी त्याचे आकर्षण ठरू शकते. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री तसेच खासदार, स्थानिक आमदारांनी ज्या आत्मीयतेने पाठपुरावा केला तीच आत्मीयता या मंदिराच्या विकासासाठी दाखवून कृतीशील पावले उचलावीत अशी जनतेची अपेक्षा आहे.
कोट-
पालकमंत्र्यांनी मार्केट यार्ड मधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यांनी जाहीर केलेल्या निधीमध्ये माझ्या आमदार फंडातून मी माझा योग्य वाटा उचलणार असून बाजार समितीकडून ही मदत मिळविणार आहोत. निश्चित कालावधीमध्ये त्याची पूर्तता होईल या दृष्टीने प्रयत्नशील राहू.
- आमदार ऋतुराज पाटील
मार्केट कमिटीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मार्केट कमिटीसाठी भूषणावह असून मंदिराच्या परिसराचा विकास करण्याची आमची इच्छा असली तरी तांत्रिकदृष्ट्या महापालिकेच्या परवानगीशिवाय आम्ही काही करू शकत नाही. त्यासाठी शासकीय पातळीवर कायदेशीर मंजुरी घ्यावी लागेल. मगच यासाठी काय करता येईल याचा विचार करणे योग्य ठरेल. या मंजुरीनंतरच जनतेच्या हिताचा विचार करून योग्य सहभाग घेऊ. आमची कमिटी सध्या प्रशासक म्हणून काम करीत असून लोकनियुक्त कमिटी आल्यानंतर त्याचा योग्य विचार होऊ शकतो.
- के. पी.पाटील, प्रशासक सभापती
मार्केट यार्ड कोल्हापूर
विठ्ठल मंदिर हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून गेली चोवीस वर्षे इथे साजऱ्या होणाऱ्या वेगवेगळ्या उत्सवांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होत असते. त्याचा नवीन पिढीवर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो. या मंदिराचा परिसर विकसित केल्यास नवीन पिढी घडण्यास मदत होईल. ही बाब जाणत्या लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावी ही त्यांच्याकडून अपेक्षा.
उत्तम जाधव,
रहिवासी जाधव वाडी