कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने दिल्ली विकासाचा हौद बांधण्यात आला आहे. तेथील विकासगंगा कोल्हापूर महापालिकेत येण्यासाठी सत्तेची पाईपलाईन जोडावी लागेल, ती येथील जनतेने जोडावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केले.शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे भाजप-ताराराणी आघाडी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोेडे, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खाडे, पुण्याच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांच्यासह उमेदवार विक्रम जरग, अजित ठाणेकर, प्रियांका इंगवले यांची होती.पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप-ताराराणी आघाडीचे सकारात्मक वातावरण पाहून विरोधकांकडून वेगळे तंत्र वापरले जात आहे, परंतु असे चांगले चांगले गुंड बीडमध्ये आम्ही सरळ केले आहेत. सज्जन माणूस गप्प असतो म्हणून अशा लोकांचे फावते; परंतु जर तो आक्रमक होऊन बाह्णा सरसावतो, तेव्हा हे लोक मागे पळून जातात. जनता जनार्दन ज्याच्या पारड्यात आपला अधिक भार टाकते, त्यांना कोणीही घरात बसवू शकत नाही.छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक लटकत ठेवले, परंतु सत्तेत आल्यावर भाजप सरकारने पर्यावरणाच्या मंजुऱ्या तत्काळ देत स्मारक पूर्ण होण्याचा मार्ग खुला करून दिला. त्यामुळे आम्हीच हे स्मारक पूर्ण करू, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.कोल्हापुरात आल्यावर ठिकठिकाणी डिजिटल फलक दिसले. त्यावर ‘आम्ही थेट पाईपलाईन आणली म्हणून आम्हाला संधी द्या’ असा उल्लेख दिसला. निवडणुका आल्या की पाईपलाईनच्या उद्घाटनांचे नारळ फोडले जातात. माजी मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते अनेकवेळा त्याचे उद्घाटन झाले, परंतु राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरसाठी संभावित थेट पाईपलाईनमधून एक ग्लास पाणीही आमच्या महिला भगिनींना मिळू शकलेला नाही, असा टोलाही मंत्री मुंडे यांनी कॉँग्रेसचे नाव न घेता लगावला.कहा है अच्छे दिन, अशी विरोधकांकडून आता ओरड होत आहे, परंतु गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी केलेले खरकटे काढायला थोडा वेळ लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)
सत्तेची पाईपलाईन जोडल्यावर विकासगंगा
By admin | Published: October 27, 2015 12:47 AM