जोतिबा : जोतिबा डोंगरावर विकास आराखड्यांतर्गत विकासकामे युद्धपातळीवर सुरु झाली असून, लॉकडाऊन काळात विकासाभिमुख कामे ‘अनलॉक’ झाल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जोतिबा विकास आराखड्यांतर्गत मंजूर झालेल्या २५ कोटींच्या विकासकामांना आता गती आली आहे. जोतिबा मंदिरात व डोंगरावरील परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी युद्धपातळीवर विकासकामे सुरु आहेत.
श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा १५५ कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. दर्शन मंडप आणि टॉयलेट ब्लॉकची कामे सुरु आहेत. जोतिबा विकास आराखड्यातील विकासकामांना गती मिळली असून, भाविक व स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे ७ कोटींचा दर्शन मंडप, ३ कोटी ५६ लाखांचा टॉयलेट कॉम्लेक्स, ६ कोटींचे सेंट्रल अॅम्पी थिएटर, ३ कोटी २७ लाखांचे घनकचरा सांडपाणी, १ कोटीचे भूमिगत विद्युत पुरवठा काम, २ कोटी ६० लाखांचे भक्त निवास, १ कोटी ५७ लाखांची पाणीपुरवठा योजना अशी कामे केली जाणार आहेत. याशिवाय काळभैरव मंदिर जीर्णोद्धाराचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिरातील दीपमाळेची दुरुस्ती केली जात आहे, मंदिर परिसरातील अंतर्गत सांडपाणी व्यवस्था कामेही सुरु आहेत.
जोतिबा डोंगरावर आता दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. चार दरवाज्यांपैकी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. मंदिरात विकासकामे सुरु असल्याने मंदिर प्रदक्षिणा भाविकांसाठी बंद ठेवली आहे. १० वर्षांच्या आतील लहान मुलांना व ६० वर्षांवरील वयस्कर व्यक्तिंना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे. भाविकांमधून ही बंदी उठवावी, अशी मागणी होत आहे. लहान मुलांना व वयस्कर व्यक्तिंना जोतिबा दर्शनापासून वंचित ठेवल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे तर याचवेळी विकासाभिमुख कामे सुरु असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.
फोटो कॅप्सन : १ ) जोतिबा डोंगरावर विकास आराखड्यांतर्गत टॉयलेट कॉम्लेक्स इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहे.