कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष व ठेकेदाराचा मनमानी कारभार यामुळे सुमारे चाळीस लाखांची कामे रखडली आहेत. विविध योजनेतून निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याबाबत मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गावातील प्रत्येक प्रभागाचा व पर्यायाने गावचा विकास व्हावा यासाठी गावातील प्रमुख मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी प्रयत्न करून पर्यावरण, १३ वा वित्त आयोग, नागरी सुविधा योजना, दलितवस्ती सुधारणा योजना, आमदार निधी, आदी योजनेतून सुमारे चाळीस लाखांचा निधी आणला आहे. यातून अंतर्गत रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, शौचालय, गटरीच्या कामाचा समावेश आहे. सन २०१३-१४ सालात निधी मंजूर झाला असून, या सर्व कामांचा ठेका गावातीलच एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.निधी मंजूर असूनही अद्याप अनेक कामे चालूच नाहीत. दलित वस्ती व माळ भागातील गटारीचे काम चालू असून, अर्ध्यावर राहिलेले काम गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंदच आहे. गटारीसाठी चर खुदाई केल्याने व काम अपूर्णच राहिल्याने रहिवाशांना ये-जा करण्यास अडचण झाली आहे. रखडलेल्या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, ठेकेदाराकडून काम होत नसेल तर ठेकेदारच बदला, अशी भूमिका विरोधी सदस्यांनी घेतली आहे. रखडलेल्या कामासाठी सदस्य एकत्र का येत नाहीत, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत. आम्ही विरोधी बाकावर असूनही विकासकामाला अडथळा करीत नाही, उलट बंद असलेली कामे चालू करा यासाठी सरपंच व ग्रामसेवकांकडे तक्रार केली आहे; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रखडलेल्या कामांबाबत शिरोळचे गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून, ठेकेदाराला काम जमत नसेल तर ठेकेदार बदलण्याची मागणीही करणार आहे.- देवगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अकिवाट.रखडलेल्या कामाबाबत ठेकेदाराकडे पाठपुरावा करीत असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.- निकीता तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत अकिवाट
अकिवाटमध्ये लाखो रुपयांची विकासकामे रखडली
By admin | Published: June 26, 2015 10:05 PM