कोल्हापूर : भाजपसोबत राहून युतीत आमची पंचवीस वर्षे सडली, असे विरोधक म्हणत होते. तेच विरोधक दोन्ही काँग्रेससोबत गेल्यावर त्यांचे अस्तित्व संपले आहे. आम्ही त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असे कोल्हापूरी भाषेत चितपट केले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.
फडणवीस म्हणाले, कोल्हापूरात एकदा रणशिंग फुंकले की त्याचा वणवा महाराष्ट्रात पेटतो असा आमचा अनुभव आहे. म्हणूनच भाजप-शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची सुरुवात कोल्हापूरातून केली जात आहे. गेल्या निवडणूकीत युतीच्या प्रचाराचा प्रारंभ ही आम्ही कोल्हापूरातून केला आणि राज्यात युतीला ४१ जागा मिळाल्या. तेच लक्ष्य घेवून आम्ही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
लोकसभेला चांगले यश मिळाले परंतू विधानसभेला जरा गडबडी झाल्या त्यामुळे पुरेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे. आमदारांनी खासदारांना निवडून आणायचे आहे आणि खासदारांनी आमदाराना विजयी करायचे आहे, हे ध्येय लक्षात घेवून मैदानात उतरायचे आहे. निकालानंतर पुन्हा विजयी मेळावा आम्ही याच कोल्हापूरात घेवू.
कोल्हापुरातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.