वारणानगर- कोल्हापुरात गेले पंधरा दिवस उत्तर विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांच्या सभांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. शनिवारी त्याचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर रविवारी वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांचे पुतणे व वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांचे चिरंजीव युवानेते विश्वेश कोरे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर समोरासमोर पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट झाली. त्यावेळी फडणवीस व मंत्री सतेज पाटील यांनी एकमेकांना नमस्कार करीत हस्तांदोलन केले.
यावेळी छत्रपती शाहू महाराज, आमदार डॉ.विनय कोरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, विविध क्षेत्रातीत मान्यवर उपस्थित होते. फडणवीस बाहेर पडल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.
मागील महिनाभरापासून कोल्हापूरात भाजपाविरुद्धमहाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी १८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव केला. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली. मात्र काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी पाटलांनी भाजपला यश मिळू दिलं नाही.