कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकातून केली. पंधरवड्यापूर्वी मौन व अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा आपण दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावल्याचे दिसते, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.काही दिवसांपूर्वी आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना मौनम् सर्वार्थ साधनम्, मौन व्रतामुळे शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांनी ती पुस्तके काही वाचलेली दिसत नसल्यानेच निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या १०० कोटींच्या मदतीवर फडणवीस यांनी, राज्य सरकारची अवस्था पॉलिसी पॅरालिसिस नाही तर ॲक्शन पॅरालिसिससुद्धा आहे, अशी टीका केली.वास्तविक पंचनामे झाल्याशिवाय अशी मदत देता येत नसते; परंतु विजेचे ट्रान्स्फॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तत्काळ मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपये तातडीने जाहीर केले. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील संकट नियंत्रणात आणले आहे. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांतील कामाबद्दल प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचणीत देशातील पाच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांत उद्धव ठाकरे यांची गणना झाली, हेच देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याचे दिसते. ज्या ज्यावेळी कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होतात किंवा मृत्यूचा आकडाही कमी असतो, त्यावेळी फडणवीस आकडे खोटे असल्याचे सांगण्यासाठी उसळून उठतात.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, चीन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार असल्याचे जाहीर केले. या लसीमुळे कोरोना संपुष्टात आला तरी देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण सुचवलेली पुस्तके त्यांनी वाचली; तर वैफल्यग्रस्त मन:स्थितीतून ते बाहेर येतील आणि मनस्वास्थ्य ठीक होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.