कोल्हापूर : लाईन बझार हॉकी मैदानावर शिवतेज तरुण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय अटल चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात देवगिरी फायटर्स, महाराष्ट्र क्रीडा मंडळ, एफसीआय (पुणे) व निशिकांत दादा पाटील स्पोर्टस फौंडेशन यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना नमवीत उपउपांत्य फेरीत धडक मारली.
गुरुवारच्या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यातील खेळाडूंची ओळख नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील व अजित ठाणेकर यांनी करून दिली. पहिल्या सामन्यात देवगिरी फायटर्स संघाने नागपूर सिटी पोलीस संघाचा ४-१ अशा गोलनी पराभव केला. सामन्याच्या १६ व्या मिनिटास नागपूरच्या अभिषेक गजभिये याने मैदानी गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २१ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर देवगिरीच्या विजय कोकरेने गोल करीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. त्यानंतर देवगिरीच्या मयूर पाटीलने २७ व ५५ व्या मिनिटास दोन मैदानी गोल केले. रोहन पवारने ३२ व्या मिनीटास गोल करत संघास ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळाने शिवतेज स्पोर्टस्वर ४-१ गोलनी विजय मिळविला. महाराष्ट्र संघाकडून संकेत पोर्लेकर, सागर पोवाळकर, समीर भोसले व आशिष पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. शिवतेज स्पोर्टस्कडून जय काळे याने २२ व्या मिनिटास एकमेव गोल केला.
तिसरा सामना एफसीआय (पुणे) संघाने खासदार एस. डी. पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) संघाच्या स्ट्रोकवर ४-१ अशा गोलनी विजय मिळविला. सामन्याच्या ४१ व्या मिनिटास एस. डी. पाटील ट्रस्टच्या महेश कांबळे याने मैदानी गोल केला. पुणे संघाच्या अब्दुल सलमाने ५१ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ अशा गोल फरकाने बरोबरीत केला. संपूर्णवेळत सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी स्ट्रोकचा वापर केला. यामध्ये पुणे संघाने ४-१ अशा गोलनी हा सामना जिंकला.
शेवटच्या सामन्यात निशिकांत दादा पाटील स्पोर्टस् फौंडेशन संघाने पुणे सिटी पोलीस संघाचा ३-१ अशा गोल फरकाने पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात नवव्या मिनिटास पुणे सिटीच्या कुणाल जगदाळे याने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच १४ व्या मिनिटास निशिकांत दादा पाटील संघाच्या सागर ढेरे याने मैदानी गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत केला. २२ व्या मिनिटास निशिकांत स्पोर्टस्च्या दिग्विजय कळसे याने, तर ५४ व्या मिनिटास विश्वजित पाटील याने गोल करीत संघास उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. स्पर्धेत पंच म्हणून संदीप जाधव, अनिकेत मोरे, धीरज पाटील, अरुण सिंग, सागर जाधव, जुब्बीन शेख, अमोल पवार, राहुल गावडे, शिवाजी डुबल हे काम पाहत आहेत. टेक्निकल टेबल स्कोअर पंच म्हणून संजय डोंगरे, दत्तात्रय पाटील, चेतन जाधव, संकेत बारक्के व अभिजित पाटील हे काम पाहत आहेत.आजचे उपांत्यपूर्व सामने१) कोल्हापूर पोलीस वि. हनुमान ब्लेसिंग (सकाळी ८ वा.).२) श्री तडाका तालीम वि. पद्मा पथक (सकाळी ९.३० वा.)३) देवगिरी फायटर्स वि. एफ. सी. आय. (पुणे) (दुपारी २.३० वा.),४) निशिकांत दादा पाटील (इस्लामपूर) वि. महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर) (दुपारी ४ वा.)