प्रवीण देसाई - कोल्हापूर तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढली आहे. विशेषत: दक्षिण भारतातील भाविकांचा यामध्ये समावेश आहे; परंतु त्यांना गेल्या दोन वर्षांत नवीन अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक थेट कळंबा (ता. करवीर) येथील अंबाबाई मंदिराकडे वळत आहेत. येथे आल्यावर त्यांना पत्ता चुकल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज किमान चार ते पाच गाड्या या परिसरातून परत जात असल्याचे चित्र आहे. ‘गुगल मॅप’वरील गोंधळाचा हा परिणाम आहे.अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या बाहेरील राज्यातील भाविकांकडून गुगल मॅपद्वारे हे मंदिर कोठे आहे? त्याचा मार्ग कसा आहे? याची माहिती घेतली जाते. या मॅपमध्ये अंबाबाई मंदिराचा मार्ग हा बंगलोर-पुणे महामार्गावरून शाहू टोल नाका, विद्यापीठ रोड, सायबर चौक, रिंग रोड, इंदिरा सागर हॉल, कळंबा रोड, कळंबा गाव असा आहे. या ठिकाणी आल्यावर अंबाबाई मंदिराला जायचे आहे, अशी विचारणा या भाविकांकडून झाल्यावर निश्चितच कुठल्या? असे उत्तर मिळते. तेव्हा कोल्हापूर, असे म्हटल्यावर त्यांना पत्ता चुकला असून, आपण आल्या वाटेने मागे जाऊन मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी मार्गे अंबाबाई मंदिरात जावा, असे सांगितले जाते. दररोज किमान चार ते पाच चारचाकी वाहनांतून भाविक कळंबा, जुना कळंबा नाका येथे थडकून जात आहेत. येथील ग्रामस्थांना हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यावर अधिक माहिती घेतल्यावर तसेच काही भाविकांना विचारल्यावर आम्ही गुगल मॅप सर्च केल्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारा मार्ग इथंपर्यंत येतो, असे सांगण्यात येते. गुगल मॅपवरील चुकीच्या माहितीमुळे भाविकांची गैरसोय होत आहेच. त्याशिवाय दररोज येणाऱ्या वाहनधारकांना तीच उत्तरे देणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांमधून ही नवीन समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. एक तर ही चूक दुरुस्त करावी किंवा कोल्हापुरात प्रवेश झाल्याबरोबर अंबाबाई मंदिराकडे येण्याच्या मार्गावर मराठी व हिंदी भाषेतील दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणीही होत आहे.उत्तरे देणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांसाठी समस्या मराठी व हिंदीभाषेतील फलक लावण्याची मागणी
परराज्यातील अंबाबाईचे भक्त थेट ‘कळंब्या’त
By admin | Published: November 06, 2015 12:29 AM