लोकमत न्यूज नेटवर्क,
काेल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा गाभारा सोमवारी स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यादिवशी भाविकांना सायंकाळपर्यंत देवीच्या मूळ मूर्तीेचे दर्शन होणार नाही. उत्सवमूर्ती मात्र सरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान शनिवारी देवीच्या पूजेतील चांदीच्या साहित्यांची स्वच्छता पूर्ण झाली असून आज रविवारी देवीच्या नित्य नैमित्तीक व जडावाच्या अलंकारांची स्वच्छता होणार आहे.
नवरात्रौत्सवाला आठ दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिरातील तयारीला वेग आला असून शनिवारी दुपारी देवीच्या धार्मिक विधींसाठी व पूजेत वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. यात देवीची उत्सवमूर्ती, अष्टमीच्या नगरप्रदक्षिणेत वापरले जाणारे चांदीचे वाहन, चौरंग, ताम्हण, मागील प्रभावळ, समया, तांब्या, वाटी, आरतीचे साहित्य यांचा समावेश आहे. ही स्वच्छता धोंडीराम कवठेकर, गजानन कवठेकर, संकेत लोहार, महेश कडणे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली.आज रविवारी देवीची उत्सवमूर्ती व मूळ मूर्तीला घालण्यात येणारे नित्य व नैमित्तीक अलंकार, आदिलशाही व संस्थानकालीन अलंकार, नवरत्नांचे जडावाच्या अलंकारांची स्वच्छता केली जाणार आहे. उद्या सोमवारी देवीचा गाभारा स्वच्छ करण्यात येणार असल्याने त्यादिवशी सकाळी साडेआठच्या आरतीनंतर मुळ गाभारा दर्शनासाठी बंद राहील. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवली जाईल. सायंकाळी ६ नंतर देवीच्या मूळ मूर्तीचा अभिषेक व आरती करून दर्शन सुरु केले जाईल.
बॅग स्कॅनरची तपासणी
सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या तीनही दरवाज्यांवर बॅग स्कॅनर बसविण्यात येत असून पूर्व व दक्षिण दरवाज्यात बसविलेल्या स्कॅनरची यशस्वी चाचणी झाली आहे. घाटी दरवाज्यात अजून स्कॅनर बसवलेले नाही.