राजू लाड
आंबा: विशाळगड येथील उरूस काळात कुर्बानी करण्यास मुंबई खंडपीठाने परवानगी दिली असतानाही पोलीस व महसूल प्रशासनाने गडावर येणाऱ्या भाविकांना कुर्बानी करण्यास आज मनाई केली. दर्गा ट्रस्टी व ग्रामस्थांनी ईद सण साजरा न करता विशाळगड बंद ठेवून प्रशासानाचा निषेध केला.पुरातत्व व वस्तू संग्रहालय उपसंचालकांनी किल्ले विशाळगडच्या संरक्षित क्षेत्रातील पशुबळी प्रथेवर दीड वर्षापूर्वी बंदी घातली होती. त्या विरोधात मलिक रेहान दर्गा ट्रस्टीनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान बकरी ईद व उरूस काळात येथे हिंदू मुस्लिम भाविक दर्शनासाठी येतात. तरी परंपरागत पशुबळी देण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार बी. पी.कुलाबावाला व न्यायमूर्ती एफ.पी.पुनावाला यांच्या खंडपीठाने दि.१७ ते२१ जून या चार दिवसांसाठी कुर्बानी करण्यास परवानगी दिली.त्यानुसार गडावर कालपासून ईद व उरूसाची जय्यत तयारी केली गेली. पण आज सकाळी गडाच्या पायथ्याशी प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून गडावर कुर्बानी करण्यास जाणाऱ्या भाविकांना पायथ्याशीच अडवले व कुर्बानीस मनाई केली. दर्गा ट्रस्टी व जे याचिकाकर्ते आहेत त्यांनाच न्यायालयाने कुर्बानीस परवानगी दिल्याचे सांगून प्रशासनाने भाविकांना कुर्बानीस विरोध केला. यामुळे गडवासियांच्यात तीव्र नाराजी पसरली.ईद सणच साजरा केला नाहीयामुळे येथील मलिक रेहान ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थांनी दर्गासमोरील चौकात एकत्रित येऊन प्रशासनाच्या या अन्यायी निर्णयाचा निषेध केला व ईद सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सर्व व्यवहार आजच्या दिवशी बंद ठेवण्यात आले. पोलीस प्रशासन खंड पिठाच्या निर्णयाचा चूकीचा अर्थ लावत असल्याचे माजी उपसरपंच आयूब कागदी यांनी सकाळी झालेल्या बैठकीत अधिकारासमोर खंत मांडली.
ईद सण व उरूसा निमित्त येथे येणाऱ्या हिंदू मुस्लिम भाविकांना पशुबळी देण्यास परवानगी ट्रस्टीनी मागितली होती. ती खंडपीठाने मंजूरही केली. पण तालूका प्रशासन खंडपीठाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून आमच्यावर अन्याय करीत असल्याची ट्रस्टी शराफत मुजावर व माजी ट्रस्टी नाजीम मुजावर यांनी व्यथा मांडली.