- आदित्य वेल्हाळकोल्हापूर : मार्गशीर्ष पौर्णिमेला सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणा-या रेणुका देवीच्या यात्रेसाठी मंगळवारी मध्यरात्री भाविक रवाना झाले. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असून आज बुधवारी कोल्हापूर शहरातून मोठ्या संख्येने यात्रेसाठी जाणार आहेत. सौंदत्ती येथे मार्गशीर्ष पौर्णिमेला रेणुका देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून लाखाच्यावर भाविक जातात. त्यासाठी पंधरा दिवस आधीपासूनच शहरातील भागा-भागातून, तालीम मंडळ, तरुण मंडळे, रेणुका भक्त संघटनांच्यावतीने एसटी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे.कोल्हापुरातील संभाजी नगर व मध्यवर्ती बसस्थानकातून जवळपास दीडशेच्या वर एसटी बसेस यात्रेसाठी जातात. यात्रेआधी तीन दिवसांपासून डोंगरावर विविध धार्मिक विधींना सुरुवात होते. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर जवळपास ५० एसटी बसेस सौंदत्तीसाठी रवाना झाल्या. आज बुधवारी रात्रीपासून जवळपास सर्वच एसटी बसेस भाविकांना घेऊन यात्रेसाठी निघतील. अनेक भाविक खासगी वाहनांनी यात्रेच्यादिवशी पहाटेच सौंदत्तीला जातात व शुक्रवारी देवीची यात्रा पार पडल्यानंतर परत येतात.
सौंदत्ती यात्रेसाठी भाविक रवाना, शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:57 AM