कोल्हापूर : अंबाबाईचे दर्शन घेऊन पुण्याला जात असताना रेल्वे स्टेशनसमोर केएमटी बसमधून खाली उतरताना महिला भाविकाची पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. पर्समध्ये तीन तोळ्याचे गंठण, कानातले टॉप्स, दोन हजार रुपये होते. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.पोलीसांनी सांगितले, धनश्री सोमनाथ श्रीगंधे (वय ३२, रा. काळेवाडी, पुणे) या तिन बहिणी, दिर, मेव्हणे यांचेसोबत शनिवारी कोल्हापुरला आल्या होत्या. रविवारी सकाळी जोतिबा आणि दूपारी अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या पुण्याला निघाल्या. दसरा चौक येथून केएमटी बसमधून ते शाहुपूरी रेल्वे स्टेशनसमोर आले.
याठिकाणी बसमधून खाली उतरताना त्यांच्या मुलाने बॅगेची पर्स उघडी असलेचे सांगितले. त्यांनी पाहिले असता बॅगेची चेन खुली असून त्यातील लहान पर्स गायब असल्याचे दिसले. बसमधून खाली उतरताना त्यांच्या पुढे एक पुरुष व मागे लहान मुलाला घेतलेली महिला होती. त्या महिलेनेच पर्सची चोरी केल्याची शंका त्यांना आहे. त्यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली.
पर्स चोरीमुळे श्रीगंधे कुटुंबिय पुण्याला जाण्यासाठी थांबले. सोमवारी दूपारी ते पुण्याला गेले. रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.