कोल्हापूर : आम्ही वर्षातून एकदा अंबाबाईच्या दर्शनाला येतो, गेल्या दोन वर्षापासून बाहेरूनच दर्शन व्हायचं आज गाभाऱ्याजवळून दर्शन घेताना देवीचं ते रुप पाहून डोळे भरून आले, असं वाटलं जणू अंबाबाईची गळाभेट घडली.., मी रोज देवीच्या संध्याकाळच्या आरतीला येते पण लांबूनच दर्शन मिळते. पण आज आतून दर्शन सुरू झाले म्हटल्यावर सकाळीच मंदिर गाठले, जवळून आईला बघता आले, मन शांत झालं..अशा शब्दात भाविकांनी गाभाऱ्याजवळून दर्शन सुरू केल्याचा आनंद व्यक्त केला.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिरात कोरोनापूर्वी गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्यापासून भाविकांना देवीचे दर्शन घडत होते. मात्र कोरोना सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या कारणास्तव शंखतीर्थ चौकातून दर्शन सुरू करण्यात आले. तेंव्हापासून गेली तीन वर्षे भाविकांना लांबूनच देवीचे पाया पडावे लागायचे आणि घाईने सरकावे लागायचे. सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्याचसून चांदीच्या उंबऱ्यापासून दर्शन सुरू केले जाईल अशी घोषणा केली. मात्र आतील परिसरात पितळी रेलिंग लावण्यासह अन्य व्यवस्था करण्यामध्ये एक दिवस गेला.बुधवारी मात्र रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पहाटे मंदिर उघडल्यापासूनच चांदीच्या उंबऱ्यापासून अंबाबाईचे दर्शन सुरू झाले आणि भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राखीपौर्णिमेचा सण असल्याने परस्थ भाविकांची संख्या तुलनेने कमी असली तरी जवळून दर्शनाचा स्थानिक व परस्थ भाविकांनी लाभ घेतला व दर्शन व्यवस्था पुर्ववत सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लांबून देवीचे ओझरते दर्शन व्हायचे पण आता गाभाऱ्याजवळून दर्शनाने जणू देवीची गळाभेट घेतल्यासारखे वाटत होते. सालंकृत प्रसन्न मूर्तीचे ते अलौकिक रुप बघताना डोळ्यांचे पारणे फिटले, असे वाटले समोर देवी उभी आहे अशा शब्दात भाविकांनी आनंद व्यक्त केला.
Kolhapur: गाभाऱ्याजवळून दर्शन घेता जणू आई अंबाबाईची गळाभेटच घडली!, भाविकांमधून समाधान
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 30, 2023 6:02 PM