इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांची ना राहण्याची सोय आहे, ना अंघोळीची, ना अन्नछत्राची. डोंगरावरची नवराई जितकी नजरेत भरते, त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात डोंगरावर विखुरलेला कचरा, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छता, घाण पाण्याने वाहणारे गटर्स डोळ्यांना खुपते. एवढे मोठे देवस्थान पण सेवा सुविधा आणि स्वच्छतेच्या नावाने चांगभलंच म्हणायची अवस्था आहे.अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह नाही, एवढी ओरड होते; परंतु त्याहून वाईट स्थिती जोतिबा डोंगरावर आहे. जोतिबा डोंगरावर भाविकांना सर्वात आधी स्वच्छतागृहाचा शोध घ्यावा लागतो. तेथे फक्त दोन सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू आहेत एक स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. दूरगावहून आलेल्या भक्तांसाठी येथे अंघोळीची सोय नाही. डोंगरावर नाष्टा मिळतो; पण जेवणाची आबाळ होते. अन्नछत्र नसल्याने सोबत जेवण घेऊन यावे लागते. किंवा कोल्हापुरात येऊन जेवावे लागते. एवढेच काय पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाणी हवे असेल तर बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.डोंगरावर कमालीची अस्वच्छता आहे, त्याची सुरुवात पार्किंग आणि मुख्य रस्त्यापासूनच होते. नजर जाईल तिथे फक्त विखुरलेला कचरा आणि जागा मिळेल तिथे कचऱ्याचे ढीग एवढेच दिसते. ही अवस्था पूर्ण डोंगरावर आहे. ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी ट्रॉल्या ठेवल्या आहेत; पण ट्रॉल्या रिकाम्या आणि कचरा रस्त्यावर आहे. घनकचरा व्यवस्थापन तर नावालाही नाही. गटर्स सिस्टीम चुकीच्या पद्धतीने केल्याने गटर तुंबलेले असतात. गल्ली बोळांमधून सांडपाणी वाहत असते. ड्रेनेज सिस्टीम नसल्याने गावचे घाण पाणी डोंगरावरून खाली पडत असते. वाऱ्याच्या माऱ्यामुळे हे पाणी उलटे येऊन मंदिराच्या शिखरावर आदळते. हा प्रकार मंदिराची पवित्रता भंग करणारा असून, त्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.पर्यटकांचे काय?डोंगरावर परंपरेनेच येणारे भाविक जास्त आहेत, ते ठरलेल्या पुजाऱ्यांच्याच घरी राहतात. दक्षिणा, शिधा देऊन तिथेच जेवतात, त्यामुळे अन्नछत्राची आणि यात्री निवासाची गरज नाही, अशी पाठराखण येथे केली जाते; पण डोंगरावर ७००-८०० घरे आहेत. एकावेळी एका घरात किती माणसांची सोय होते, याला मर्यादा आहेत. रोज हजारो पर्यटक-भाविक येतात. त्यांना पुजाऱ्यांची ओळख नसते. गुरवांकडे राहणाऱ्या भाविकांपेक्षा अशा भाविक-पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यांची सोय कशी होणार, याचा विचार केला जात नाही.
सेंट्रल प्लाझा अन् दुकानगाळ्यांची कचराकुंडीआराखड्यांतर्गत १९९१ साली बांधलेल्या सेंट्रल प्लाझामध्ये मोठमोठी झाडी उगवल्याने दगडी बांधकाम दिसत नाही. सगळीकडे कचऱ्याचे ढीग आहेत. पार्किंगमध्ये चुकीच्या पद्धतीने बांधलेले ३५ हून अधिक दुकानगाळे बंद व दुरवस्थेत आहेत. ज्या दोन कामांसाठी त्याकाळी लाखोंचा निधी खर्ची पडला तो शब्दश: पाण्यात गेला आहे.
सगळी कामं अर्धवटच२०१७ मध्ये आलेल्या अडीच कोटींत जिल्हा परिषदेने सासनकाठ्यांना अडथळा होऊ नये म्हणून भूमिगत विद्युत व्यवस्था केली. डोंगरावरील मुख्य रस्ता आणि ठाकरे मिटके गल्ली या दोनच ठिकाणी हे काम झाले आहे, तेथेही पूर्वीचे लाईटचे खांब, वायरिंगच काढलेले नाही. त्यामुळे सासनकाठी मार्गावर होता तसा अडथळा कायम आहे. पार्किंगच्या जागेत दर्शनी भागातच महिला व पुरुषांसाठी दोन मजली स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले. अख्खी इमारत तयार झाली; पण ड्रेनेज सिस्टीम केलेली नाही.