कोल्हापूर : प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली असून, शुक्रवारपासून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.राज्यशासनाकडून प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूची उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीस २०१८ पासून प्रतिबंध केला आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. आरोग्यविभागाची पाच पथके नियुक्ती केली आहेत.
प्लास्टिकसाठा जप्त करण्याबरोबरच प्रथम दंड ५ हजार रुपये, द्वितीय दंड १० हजार रुपये आणि तृतीय दंड २५ हजार रुपये आणि तीन वर्षांचा कारावास शिक्षा आहे. पथकामार्फत प्लास्टिक बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, तसेच थर्माकॉल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तूंचे विक्री करण्यास प्रतिबंध, जप्ती आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.