कोल्हापूर : जिल्ह्यात बायोडिझेल अनधिकृत विक्री विरोधात धडक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व तहसीलदार व ऑइल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या.
जिल्ह्यात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना अधिकृतरीत्या बायोडिझेल विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणी अवैधरीत्या बायोडिझेल विक्री करत असल्यास नागरिकांनी त्यांच्याकडून बायोडिझेल खरेदी करू नये. ज्या व्यक्ती बेकायदेशीररीत्या अवैध बायोडिझेल परवानाधारकाकडून, बायोडिझेल खरेदी-विक्री करून वाहनात भरताना व इतर कामकाजासाठी वापरताना आढळतील त्यांच्यावर वाहनासह जीवनावश्यक कायद्यांतर्गत कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अनधिकृत बायोडिझेल विक्री करणाऱ्यांबाबत जिल्ह्यातील नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी तहसीलदार किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळवावे. त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
----