कोल्हापूर : यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशके फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी व शेतमजुरांचे मृत्यू झाले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे; परंतु या संपूर्ण प्रकाराला केवळ कृषी सेवा विक्रेत्यांना दोषी धरून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून शनिवारपर्यंत कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.
दुपारी बाराच्या सुमारास शाहूपुरी येथील डुणुंग यांच्या दुकानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मागण्यांचे फलक घेतलेल्या कृषी सेवा विक्रेत्यांचा हा मोर्चा स्टेशन रोड, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. यानंतर नायब तहसीलदार अपर्णा मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
ज्या कृषी सेवा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्यात यावेत. निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत. आॅनलाईन परवान्यात समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. शासनाचे कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विभागाकडील शासन निर्णयानुसार बिगरनोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातून विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यावर सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेऊन या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कृषी सेवा कायद्याच्या कक्षेत कशा घेता येतील, याचा विचार व्हावा.
शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र कृषी सेवा विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. कृषी सेवा विक्रेत्यांकडील बियाणे, कीटकनाशके, खते, हस्तलिखित साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेले साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदोलनात विकास कदम, एस. आर. डुणुंग, विनोद पाटील, शशिकांत चव्हाण, सचिन जंगम, मदन आणुसे, विलास जाधव, सागर खाडे, टी. सी. पाटील, संजय पवार, आदींचा समावेश होता.