सदाशिव मोरे आजरा : संकेश्वर - आजरा - बांदा महामार्गावर आजऱ्यानजीक उभारला जात असणारा टोलला हद्दपार करण्यासाठी हजरत तालुक्यातील जनतेने टोल नाक्यावर आज धडक मोर्चा काढला. टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. टोल देणार नाही यासाठी गटतट पक्ष विरहित सर्वपक्षीय मोर्चात एकवटले. यामुळे आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टोल हटवून आजऱ्याचा टोल पॅटर्न देशभर राबविणार असल्याचे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. मोर्चा हॉटेल मिनर्वापासून सुरू झाला. टोल नाक्यावर गेल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी टोल कायमचा हद्दपार झालाच पाहिजे, टोलची टोलवाटोलवी थांबलीच पाहिजे, देणार नाही देणार नाही टोल देणार नाही, टोल मुक्ती संघर्ष समितीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
आजरा तालुक्यातील जनतेला उध्वस्त करणारा टोल देणार नाही. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण असताना टोल का ? रस्त्याच्या बांधकामासाठी लागलेले पैसे राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावेत. पण आजरावासिय टोल देणार नाही असे कॉ. संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, मुकुंद देसाई, शैलेश देशपांडे, वसंतराव धुरे, उमेश आपटे, डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. आजरावासीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी सांगितले.जन आंदोलन, राजकीय दबाव व कायदेशीर लढाईतून आजऱ्याचा टोल हद्दपार केला जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जन आंदोलनातून जनतेची ताकद दाखवू असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. टोलबाबत आजरेकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून निश्चित मार्ग काढू असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोबाईलवरून सांगितले.मोर्चात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, सुधीर कुंभार, उमेश आपटे, अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर, अनिकेत कवळेकर, जयवंत शिंपी, डॉ.अनिल देशपांडे, अल्बर्ट डिसोझा, एम.के. देसाई, अंजना रेडेकर, राजलक्ष्मी देसाई, रचना होलम, मनीषा देसाई, विष्णू केसरकर, नामदेव नार्वेकर, संकेत सावंत यासह आजरा तालुकावासिय सहभागी झाले होते. टोलच्या लढ्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला.