महेश आठल्ये ल्ल म्हासुर्लीराधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्याच्या हरितक्रांतीस योगदान ठरणाऱ्या राही (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम प्रशासकीय मंजुरीनंतर तब्बल वीस वर्षे, तर प्रत्यक्ष काम सुरू होऊन गेली सोळा वर्षे विविध कारणांनी अर्धवट अवस्थेत रखडले आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दोनवेळा मोर्चे काढले व सरकारने दोनवेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न आणि फेरनिविदेत प्रकल्पाचे काम याहीवर्षी सुरू न झाल्याने खोऱ्यातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रकल्पाच्या कामाबद्दल दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. सन १९९६ मध्ये धामणी नदीवर राही येथे ३.८५ टीएमीसी क्षमतेच्या व १२० कोटी खर्चाच्या धामणी मध्यम प्रकल्पास मंजुरी मिळाली. मात्र, सन २००० मध्ये गुराढोरांसह मोर्चा काढल्यावरच प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. पुनर्वसनाचा प्रश्न, निधीची कमतरता, वनविभागाचा अडथळा आदींमुळे प्रकल्पाचे अनेक वेळा काम बंद पडले. सध्या ५० टक्क्यापेक्षा अधिक काम झाले असून पुनर्वसनाचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटला आहे. मध्यंतरीच्या सिंचन घोटाळ्यात या प्रकल्पावर ताशेरे ओढले होते. मात्र, आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर आला. गतवर्षी धामणी खोरा विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. संबंधित विभागाचे मंत्री विजय शिवतारे यांनी म्हासुर्ली येथे प्रकल्प पूर्णत्वाबद्दल आश्वासन दिले होते. मंत्रालयात कृती समिती, दोन्ही आमदार, संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यावर्षी दिवाळीनंतर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न व नुकसानभरपाईची रक्कमही वाटप करण्यात आली. ७८२ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्प पूर्णत्वाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दिवाळीनंतर प्रकल्पाचे काम सुरू होण्यासंदर्भात काहीही हालचाली झालेल्या नाहीत. काही घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न व फेरनिविदा या दोन कारणांमुळे प्रकल्पाचे काम थांबले असल्याची चर्चा आहे. प्रकल्पाचा खर्च १२० कोटींवरून ८०० कोटींवर पोहोचला आहे. सध्या धामणी खोऱ्यात पाणीटंचाई जाणवत असून येत्या महिन्याभरात पिके वाळून जाणार आहेत. प्रकल्पाचे काम रखडल्याने या खोऱ्यात मुबलक शेती असूनही येथील बळिराजास मात्र झाडेतोड, सेंट्रिंग, गुऱ्हाळघर कामावर जावे लागत असून खोरे विकासापासून कोसो दूर आहे. सध्या कृती समितीने बैठक घेऊन पुन्हा आंदोलन करण्याविषयी गावागावांत पूर्वतयारी सुरू केली आहे.
लालफितीमुळे धामणी खोरा तहानलेलाच
By admin | Published: March 06, 2017 12:19 AM