श्रीकांत ऱ्हायकरतुळशी - धामणी परिसरातील ४०हुन अधिक गावांच्या रुग्णसेवेचा आधार असलेले धामोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'ऑक्सिजनवर ' असल्याचे चित्र आहे . परिणामी रुग्णांनाच येथे कर्मचारी कोण ? शोधण्याची वेळ आली आहे. त्यात भरीत भर म्हणजे या आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्र व आरोग्य केंद्रात 'चार ' कर्मचारी ही असे आहेत की, त्यांची निमुक्ती या ठिकाणी असून ते प्रत्यक्षात दुसऱ्याच आरोग्य केंद्राकडे काम करत आहेत . त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.धामोड प्राथमिक आरोग्य केंद्र हे राधानगरी तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामध्ये सात उपकेंद्रांचा समावेश होतो. हे आरोग्य केंद्र या गावांसाठी रुग्णसेवेचा मोठा आधार आहे. पण असे असताना याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना देखील एक वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे .सध्या तर प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावरच आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. पण जबाबदार अधिकारी नसल्याने कर्मचारी केंव्हाही ये जा करतात. कांही वेळेला तर कर्मचाऱ्याअभावी हा दवाखाना पूर्णपणे ओस पडलेला असतो.वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने कांही वेळा येथील ओपीडी पूर्णपणे बंद असते. बेशिस्त प्रशासनामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी नित्याचिच बानली आहे . या सर्व गोष्टीच परिणाम म्हणून रुग्णानी या आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविली आहे. आज तर एक शिपाई व आरोग्य परिचारिका या दोन व्यक्तिंच्यावर येथील दिवसभराचे कामकाज सुरू होते. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्ण येथील कारभाराबाबत पूर्णपणे नाराज आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांचे वाढत असलेली मनमानी ही बाह्य रुग्ण संख्या घटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
डोंगर कपाऱ्यातील वाडया -वस्त्यांसाठी हा दवाखाना आधारवड आहे . गेल्या दोन महिन्यापासून खरोखरच रुग्णांची मोठी हेळसांड होत असून जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील वैद्यकिय सेवा पूर्ववत सुरू करावी- दिपक भामटेकर, ग्रामस्थ, धामोड