श्रीकांत ऱ्हायकरधामोड (ता. राधानगरी) : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.धामोड येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये नऊनंबर, लाडवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी व तुळशी धरण वसाहत या गावांचा समावेश होतो. या सर्व गावांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सध्या या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे.
पण गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या मिळकत उत्पन्नातील घरफाळा व पाणीपट्टीचे जवळपास सोळा लाख रुपये थकल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यातच थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज महामंडळाने तगादा लावला आहे. पण ग्रामपंचायतीकडे हे वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यास या सर्वच गावचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. याची पूर्व कल्पना म्हणून गावातून वारंवार दौंडी देऊन लोकांना पाणीपट्टी व घरफाळा भरण्याचे आवाहन केले आहे. पण लोकांनी या आवाहनाला दाद न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कालच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गावकऱ्यांकडून घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य न मिळाल्यास एक फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण डिमांड व वसुली यांचा विचार केला असता लाईट बिल व इतर खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य असल्याची बाब सर्व सदस्यांना सांगीतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय बैठकअंती घेतला आहे .-एल. एस. इंगळेग्रामसेवक, धामोड.
थकित घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन धामोड वाशीयांना वारंवार करून देखील ते भरण्याची तसदी त्यांनी न घेतल्याने नाईलाजास्तव ही कठोर पावले उचलावी लागणार आहेत .- अशोक सुतारसरपंच, ग्रामपंचायत, धामोड