कोल्हापूर : मी केवळ दोन्ही उमेदवारांमध्ये तुलना करण्याच्या अनुषंगाने बोललो, त्यामध्ये कोणत्याही महिलांचा अपमान केलेला नाही. काँग्रेसच्या लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी व्यक्त केली.महाडिक यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाला. गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर महाडिक म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे माझे बोलणे अर्धवट दाखवत विपर्यास केला जात आहे. गेली २० वर्षे अरुंधती महाडिक, शौमिका महाडिक या महिला सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. याची जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.पालकमंत्र्यांनी या सगळ्याचा इव्हेंट केला आहे. महिलांना कपाळावरील कुंकू पुसायला लावून काळे लावायला सांगितले, असे महाराष्ट्रात कुठेही झाले नाही ते कोल्हापुरात झाले. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनाही चुकीची माहिती दिली गेली. त्यांच्याशी मी बोललो आहे, असे महाडिक यांनी सांगितले.
चित्रा वाघ यांनीही टोचले कानभाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून कोणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्ये करू नये, अशा शब्दांत महाडिक यांचे कान टोचले आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवले, महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेबाला रडवले. इतिहास सांगतो, आमच्या स्त्रीने शत्रूला तुडवला... महिलांचा सन्मान व्हायला हवा, असे वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.