जयसिंगपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सध्या राजकीय खलबत्ते सुरू आहेत. त्यातच भाजपचे धनंजय महाडिक यांनी गुरुवारी शिरोळ येथे निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबरोबरच आगामी नगरपालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याचे समजते.
येत्या १२ जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपाकडूनही देखील चाचपणी सुरू झाली आहे. दरम्यान, गुरुवारी भाजपाचे धनंजय महाडिक शिरोळ दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या भेटीबरोबरच त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची निवासस्थानी भेट घेतली. तासभर त्यांच्यात चर्चा झाली. महाडिक यांनी भाजप पक्षाचा संपर्क दौरा होता, असे सांगितले. कोणत्याही राजकारणावर चर्चा झाली नाही. महाडिक यांनी शिरोळ दौऱ्यात आपली भेट घेतली, असे शेट्टी यांनी सांगितले.
या वेळी स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगरसेवक रामचंद्र डांगे, शीतल गतारे, बजरंग खामकर, शैलेश आडके, शंकर नाळे, सागर मादनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गोकुळ निवडणुकीनंतर महाडिक-शेट्टी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
फोटो - ०८०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे गुरुवारी माजी खासदार धनंजय महाडिक तालुका दौऱ्यावर आले होते. या वेळी डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शीतल गतारे उपस्थित होते.