कोल्हापूर : संसदेतील ७९२ खासदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा मान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मिळविला आहे. पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेने याबाबत सर्वेक्षण केले आहे. यामध्ये महाडिक यांनी गावपातळीपासून ते देशाच्या स्तरावरील ७0४ प्रश्न विचारत धडाकेबाज कार्यशैली कायम ठेवल्याचे नमूद करण्यात आले आहे. गतवर्षी हा बहुमान खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाला होता. सोमवारी ‘लोकमत’च्या कोल्हापूर कार्यालयास खासदार महाडिक यांनी सदिच्छा भेट दिल्यावर ही माहिती दिली. त्यांचे स्वागत संपादक वसंत भोसले यांनी केले. यावेळी वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सह. वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, मध्य रेल्वे मुंबई विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, मिलिंद धोंड, संग्राम निकम, इंद्रजित जाधव, नितीन लोहार उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळीही महाडिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महाडिक म्हणाले, तीन वर्षांत संसदेत अव्वल स्थान मिळविण्याचा बहुमान कोल्हापूरला नव्हे, तर महाराष्ट्राला मिळाला आहे. कोल्हापूरकरांनी मला संसदेत विश्वासाने व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठविले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मी अव्वल स्थानावर पोहोचण्याच्यादृष्टीने माझी कार्यशैली निर्माण केली. त्यामुळेच कोणताही राजकीय अनुभव नसताना पहिल्या वर्षी मी ‘टॉप टेन’मध्ये, दुसऱ्या वर्षी ‘टॉप थ्री’ तर तिसऱ्या वर्षी ‘टॉप’वर पोहोचलोे. तेवीस उच्चपदस्थांचा समावेश असलेली पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार आणि सर्व राज्यांतील आमदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात खासदार धनंजय महाडिक अव्वल स्थानावर राहिले. पत्रकार परिषदेला अरुंधती महाडिक, माजी महापौर सुनील कदम, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर उपस्थित होते. चालू अधिवेशनात २६८ प्रश्न पाठविलेचालूवर्षीच्या अधिवेशनासाठी २६८ प्रश्न संसदीय समितीकडे मेलद्वारे पाठविले आहेत. त्यावर सखोलपणे चर्चा केली जाणार आहे. बातम्या, आपल्याकडे घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समस्या हेच या प्रश्नांचे स्रोत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत मी संसदेत मुद्देसूदपणे प्रश्नांची मांडणी केल्याने इतर राज्यांतील प्रश्नही आता माझ्याकडे मांडण्यासाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी सुमारे ७०४ प्रश्न मांडून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. यापैकी बहुतांशी प्रश्नांची शासनाने दखल घेतली आहे.‘बास्केट ब्रीज’सारखे आणखी प्रकल्पकोल्हापूरच्या सौंदर्यात मानाचा तुरा खोवणारा ‘बास्केट ब्रीज’ हा प्रकल्प मंजूर झाला असून,येत्या जुलैपासून त्याची निविदा प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे यासारखे अनेक आव्हानात्मक आणि सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प शासनासमोर मांडून ते मंजूर करून घेऊ, असेही ते म्हणाले.
धनंजय महाडिक देशातील ‘टॉप’ खासदार
By admin | Published: March 07, 2017 12:43 AM